Nanded: चक्क भाच्यानंच दिली मामा-मामीला लुटण्याची सुपारी; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Nanded Crime News: या प्रकरणात भाच्यासह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) देगलूर येथे दरोडा टाकून घरातील चार लाखांचा ऐवज लंपास करत, वृद्ध दांपत्याचे दोरीने हातपाय बांधून महिलेची हत्या करण्यात आली होती. ही घटना 23 जानेवारीला समोर आली होती. या घटनेनं नांदेड जिल्हा हादरला होता. मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अखेर आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, भाच्यानेच आपल्या मामा-मामीला लुटण्याची सुपारी दरोडेखोरांना दिली असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात भाच्यासह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. श्रीपतराव रामजी पाटील आणि चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील, असे मृत पतीपत्नीचे नावं असून, शहाजी मरतळे असे आरोपी भाच्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देगलूर शहरातील उदगीर रस्त्यावरील शास्त्रीनगरमध्ये श्रीपतराव रामजी पाटील यांच्या घरावर दरोडा पडल्याची घटना 23 जानेवारीला घडली होती. दरम्यान, यावेळी श्रीपतराव पाटील आणि त्यांची पत्नी चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील यांचे हात-पाय आणि तोंड कपड्याने बांधून, चंद्रकलाबाई यांची हत्या करण्यात आली होती. तसेच, चोरट्यांनी सोन्या-चांदीचा 3 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान देखील होते. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांची टीम आणि स्थानिक गुन्हे शाखेसह मुखेड, मरखेल, मुक्रमाबाद पोलिसांचे शोधपथक तयार करण्यात आले होते. यावेळी तपास सुरू असतानाच पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती अधारे सीसीटीव्हीमधील आरोपींची ओळख पटली. त्यामुळे पोलिसांनी ओळख पटताच आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेत मयत चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील यांच्याबाबत त्यांचा भाचा शहाजी मरतळे याने स्वतःच्या मामाच्या घरी चोरी करण्यासाठी अन्य आरोपींना माहिती दिली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
मिस्त्री काम करताना केली रेकी...
मृत चंद्रकलाबाई यांच्या बहिणीचा मुलगा असलेला शहाजी मोरतळे याने श्रीपतराव पाटील यांच्या घरी मिस्त्री काम करण्यासाठी विठ्ठल बोईनवाड याला पाठविले होते. मिस्त्री काम करीत असताना बोईनवाड याने घरात किती सोने, रोख याची इत्यंभूत माहिती मिळविली होती. त्यानुसार त्यांनी 23 जानेवारीला दरोडा टाकला. मात्र या दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांच्या चार पथकांनी तब्बल 96 तासांचे सीसीटिव्ही फुटेज तपासणी करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. विठ्ठल व्यंकट बोईनवाड, बालाजी पंढरी सोनकांबळे, गौतम दशरथ शिंदे, शेषराव माधवराव बोईनवाड, शहाजी श्रीराम मोरतळे, साईनाथ नागन्नाथ मामीलवाड अशी आरोपींची नावं आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :