(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded: घराच्या अंगणात झोपलेल्या व्यक्तीसोबत घडलं भयंकर, अज्ञात व्यक्तीने थेट...
Crime News: पोलिसांकडून तपासाचे चक्र फिरवत आरोपीचा शोध घेतला जात आहे.
Nanded Crime News: राज्यभरात शुक्रवारी सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत सुरू असतानाच, नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील चाभरा येथे खुनाची घटना उघडकीस आलीय. घराच्या अंगणात झोपलेल्या व्यक्तीवर कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या केल्याचे समोर आले आहे. बालाजी दिगंबर काकडे ( वय 35) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांकडून तपासाचे चक्र फिरवत आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील बालाजी काकडे हे आपल्या घरी नेहमीप्रमाणे घरासमोरील अंगणात झोपले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने झोपेतचं काकडे यांच्या मानेखाली डोक्याजवळ, उजव्या डोळ्याच्या बाजूस असे पाच ते सहा कुऱ्हाडीचे घाव घातले आहेत. या हल्ल्यात बालाजी हे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून चोरांनी हदगाव तालुका परिसरात धुमाकूळ घातला होता. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सुरुवातीला हा हल्ला चोरट्याने केला असल्याचे बोलले जात होते. मात्र पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा घातपात असल्याचा संशय आहे. तर मृत काकडे यांच्या नातेवाईकांनी सुद्धा घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांकडून तपास सुरु...
अर्धापुर तालुक्यातील चाभरा येथे घडलेल्या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत तपास सुरु केला आहे. तसेच चोरट्यांनी ही हत्या केली आहे की, इतर कुणी घातपात केला आहे या दोन्ही दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये मोठ्याप्रमाणावर भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे आरोपींना शोधण्याचे पोलिसांसमोर आवाहन असणार आहे.
तरुणाची हत्या...
दुसऱ्या एका घटनेत नांदेडच्या (Nanded News) हिमायतनगरमधील वाशीच्या जंगलात एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मृतदेहाशेजारी लिंबू, तांब्या, फुले आढळल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड असं मृत व्यक्तिचं नाव आहे.