आधारावर खाडखोड, लोकांचे अंगठे घेऊन पैसे लाटले, आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास करण्याचा आदेश!
Mazi Ladki Bahin Yojana : नांदेडमध्ये माझा लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याअंतर्गत हजारो रुपये लाटण्यात आले आहेत.
नांदेड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या बहुचर्चित योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणाला सध्या सुरुवात झालेली आहे. या तिसऱ्या हप्त्यात पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जात आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, एकीकडे हजारो महिलांना या योजनेचा लाभ मिळत असताना दुसरीकडे याच योजनेअंतर्गत सरकारची फसवणूक करण्याचा नाव प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महिलेला मिळणारे पैसे लाटण्यात आले आहेत. येथील सीएससी केंद्रचालकाने हा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने हा घोटाळा केला आहे. या सीएससी केंद्राचने नाव सचिन मल्टीसर्व्हिसेस असे आहे. सचिन थोरात हा इसम हे केंद्र चालवतो. त्याने रोजगार हमी योजनेसाठी म्हणून ओळखीच्या पुरुषांचे आधार कार्ड तसेच बँक पासबुक जमा केले. मात्र रोजगार हमी योजनेसाठी अर्ज भरण्याऐवजी त्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले. विशेष म्हणजे त्यासाठी त्याने महिलांच्या आधार कार्डावर खाडाखोडदेखील केली. महिलांच्या आधार कार्डवर त्याने पुरुषांचे नाव लिहिले. तसेच अर्ज करताना पुरुषांचे आधार क्रमांक आणि बँक अकाऊंट नंबर टाकले.
अन् बिंग फुटलं
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्यानंतर सचिन थोरात याने पुरुषांचे अंगठे घेऊन पैसे उचलले. माझे रोजगार हमी योजनेचे साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले, असे सांगून त्याने पुरुषांच्या खात्यावर जमा झालेले पैसे स्वतःच्या खात्यात वर्ग करायला लावले. असेच पैसे गावतील सय्यद अलीम या युवकाच्या खात्यावरदेखील पैसे जमा झाले होते. त्यानेही जमा झालेले पैसे सचिन थोरात याला नेऊन दिले. पण शंका आल्याने अलीम याने बँकेत जाऊन चौकशी केली तेव्हा लाडकी बहिण योजनेचे ते पैसै असल्याचे त्याला कळाले आणि सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचे उघड झाले.
एकूण 37 जणांची फसवणूक
दुसरीकडे गावातील अन्य पुरुषांच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचे संदेश आले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. हा प्रकार उजेडात आल्यानंतर केंद्र चालक सचिन थोरात फरार झाला आहे. गावातील जवळपास 37 जणांची त्याने फसवणुक केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाची नांदेड जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. प्रशासनाकडून या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.
521 कोटी रुपयांचे लाभ हस्तांतरण
दरम्यान, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्या, सुरुवात झाली आहे. दिनांक 29 सप्टेंबर रोजी 34 लाख 74 हजार 116 महिलांना 521 कोटी रुपयांचे लाभ हस्तांतरण करण्यात आले आहे. उर्वरित महिलंच्या लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र महिलांना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तीसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात येत आहेत.
लाडकी बहीण फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश - जिल्हाधिकारी
दरम्यान, लाडकी बहीण योजने संदर्भात झालेल्या या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
हेही वाचा :