Ladki Bahin Yojana : सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना मेसेज आले,अर्ज मंजूर झाले, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच
Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरमधील अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना व मुलींना पुरेशा सोयी - सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना जुलै महिन्यापासून दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून ही योजना राबवण्यात येत आहे. सरकारनं सप्टेंबर महिन्यात देखील महिलांना नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करुन दिली होती. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांसाठी मोठी अपडेट आहे. ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल केले आहेत त्यांचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे. यासंबंधीचे मेसेज महिलांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवले जात आहेत.
तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाच वेळी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. 17 ऑगस्टला पुण्यात कार्यक्रम घेत ज्या महिलांनी जुलै महिन्यात नोंदणी केली होती त्यांना 3 हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली होती. त्यावेळी जवळपास 1 कोटी 9 लाख महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती. तर, नागपूरमधील कार्यक्रमात जवळपास 50 लाख महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती. नागपूरमधील कार्यक्रम 31 ऑगस्टला पार पडला होता. आता 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाद्वारे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना तिसरा हप्ता यावेळी मिळेल. सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांन किती रक्कम मिळणार याबाबतचं चित्र स्पष्ट झालेलं नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी
संबंधित महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एका अविवाहित महिलेला लाभ मिळणार आहे. महिलेचं वय 21 वर्षे पूर्ण ते 65 वर्ष पूर्ण या दरम्यान असावं. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत असल्यानं त्यापूर्वीच महिलांनी अर्ज सादर करणं आवश्यक आहे. 1 ऑक्टोबरपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करता येणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय समोर आलेला नाही.
इतर बातम्या :