लाडकी बहीण योजनेत कुणाला 4500 तर कुणाला 1500 रुपये मिळणार, सरकारचा नियम काय ? सोप्या भाषेत समजून घ्या
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे. महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत.
मुंबई : राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) तिसऱ्या हप्त्याचे वितरण चालू झाले आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यात प्रतिमहा 1500 रुपये याप्रमाणे पैसे जमा होत आहेत. महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केल्यानुसार 29 सप्टेंबर रोजी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. दरम्यान, तिसऱ्या हप्त्याचे वितरण चालू झालेले असतानाच काही पात्र महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होत आहेत, तर काही महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळत आहेत. परिणामी अनेक महिलांमध्ये गोंधळ उडाला आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांच्या बँक खात्यावर वेगवेगळी रक्कम का जमा होत आहे? सरकारचा नवा नियम काय आहे? हे जाणून घेऊ या...
सरकारचा नेमका नियम काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै 2024 पासून पात्र महिलांना लाभ दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत दोन हप्त्यांच्या माध्यमातून महिलांना लाभ मिळालेला आहे. सरकारने केलेल्या घोषणेनुसार ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा लाभ देण्यात आलेला होता. म्हणजेच ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या महिलांना एकूण तीन हजार रुपये देण्यात आले होते. मात्र सरकारच्या नव्या नियमानुसार लाडकी बहीण योजनेसाठी 1 सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ मिळेल. म्हणजेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेला आहे, त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 हजार रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्यांना महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळतील.
कोणत्या महिलांना 4500 रुपये मिळणार?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना आतापर्यंत 3000 रुपये मिळालेले आहेत. मात्र 1 सप्टेंबरच्या अगोदर अर्ज केलेला असूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत. अर्ज मंजूर झालेला असूनही या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे तसेच अर्जातील इतर त्रुटींमुळे महिलांना हा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे वरील सर्व त्रुटी दुर केलेल्या महिलांना आता तिसऱ्या टप्प्यात 4500 रुपये मिळणार आहेत.
आधार क्रमांक बँकेला लिंक करणे गरजेचे
लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ घ्यावयाचा असेल तर तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. तसे नसल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. पात्र असूनदेखील तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
दरम्यान, येत्या 29 सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडून रायगडमध्ये मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे वितरण केले जाणार आहे.
हेही वाचा :