(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Ashok Chavan : अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर हे आज स्वगृही परतणार आहेत. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
मुंबई : विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांचे दौरे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांचे दौरे असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी देखील सुरु आहे. त्यातच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या समीकरणामुळे निवडणूक लढवण्याची इच्छा असणारे काही नेते पक्षांतर करतानाही पाहायला मिळत आहेत. आता भाजपचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) हे आज स्वगृही परतणार आहेत. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे देखील भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र, आता भास्करराव खतगावकर हे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे अशोक चव्हाणांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश
आज नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. मीनाताई खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे यांच्यासह अनेक नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य आज शुक्रवारी दुपारी एक वाजता टिळक भवन दादर येथे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँगेस प्रवेशाची घोषणा केली होती. खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर (Meenal Khatgaonkar) यांना नायगाव मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे खतगावकर यांनी जाहीर केले होते. यासंदर्भात अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना विचारले असता खतगावकर आमच्याकडे राहिले तर सुरक्षित राहतील मी इतकं सांगू शकतो, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अशोक चव्हाणांकडून अपेक्षाभंग म्हणून काँग्रेसमध्ये परत; मेहुणे अन् माजी खासदार खतगावकरांची घोषणा