Nanded Rainfall Update : नांदेड जिल्ह्यातील 21 मंडळात अतिवृष्टी; सरासरी 56.60 मिमी पावसाची नोंद
Nanded Rainfall Update : गेल्या 24 तासामध्ये जिल्ह्यातील 21 मंडळात अतिवृष्टी झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.
Nanded Rainfall Update : मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागात गेल्या दोन दिवसात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान नांदेड (Nanded) जिल्ह्यातील अनेक भागात असाच जोरदार पाऊस (Rain) पाहायला मिळत आहे. तर गेल्या 24 तासामध्ये जिल्ह्यातील 21 मंडळात अतिवृष्टी झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. तर दुबार पेरणीचे संकट देखील टळले असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून पाऊस गायब असल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 21 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 53.60 मिमी पाऊस झाला आहे. उमरी तालुक्यात सर्वाधिक 100.30 मिमी पाऊस झाला. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 891 मिमी असून, आतापर्यंत 258 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अजूनही अपेक्षित पाऊस झाला नसल्याचे समोर आले आहे. परंतु मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.
जिल्ह्यात बुधवार (19 जुलै) रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 53.60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण 258.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवार 19 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंसात एकूण पावसाची आकडेवारी आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी
नांदेड - 74.40 (196.50)
बिलोली - 58.40 (337.10)
मुखेड - 30 (321.20)
कंधार - 36.60 (155.10),
लोहा - 61 (199.40)
हदगाव - 39.40 (211.90)
भोकर - 68.10 (291.50 )
देगलूर - 33.50 (246.70)
किनवट - 42 (319.70 )
मुदखेड- 70.50 (254)
हिमायतनगर - 46.80 (179.50)
माहूर - 37.80 (356.40)
धर्माबाद- 73.80 (306.50)
उमरी - 100.20 (312.20)
अर्धापूर- 77.90 (254.70)
नायगाव - 59.20 (235.20 )
उमरी तालुक्यात पुरामुळे 15 गावांचा संपर्क तुटला
उमरी तालुक्यातील मनूर ते बोळसा मार्गावरील पर्यायी असलेला खरडा पूल पाण्याने वाहून गेल्याने गोदाकाठावरील जवळपास 15 गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या दोन दिवसापासून उमरी तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे निळा ते बासर जाणाऱ्या नवीन राज्य रस्त्यावरील बोळसा ते मनूर गावाजवळील पर्यायी खरडा पूल वाहून गेल्याने अक्षरशः 15 गावाचा संपर्क तुटला आहे. या भागातील माळकोठा, दरेगाव, हंगीरगा, बोळसा गंगा पट्टी, मनूर, इज्जतगाव, बळेगाव यासह जवळपास 15 गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच भायेगाव, रहाटी, बोळसा, कुदळा या मार्गावरील अरुंद व कमी उंचीचा कुदळा गावाजवळील पुलावरून पाणी गेल्याने अनेक तास हा रस्ता बंद होता. त्याचप्रमाणे येंडाळा, महाटी, कौडगाव, बिजेगाव, शिंगणापूर, कारेगाव हा मार्ग देखील रस्त्यावर पाणी आल्याने काही वेळ बंद पडला होता. मुसळधार पावसाने गोदाकाठावरील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: