Marathwada Rain Update : मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी; विभागात आतापर्यंत 30.5 टक्के पाऊस
Marathwada Rain Update : विभागातील अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
Marathwada Rain Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचे (Rain) वातावरण पाहायला मिळत असून, मराठवाड्यात (Marathwada) देखील पावसाने हजेरी लावल्याचे चित्र मंगळवारी आणि बुधवारी पाहायला मिळाले. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर विभागातील अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तसेच हिंगोलीतील कयाधू नदीला या वर्षात पहिल्यांदाच पूर आला आहे. तर एका ठिकाणी घर कोसळून नुकसान झाले आहे.
हिंगोली : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पाऊस झाला. मागील 24 तासांत सरासरी 71.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर तीसपैकी 11 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीला पहिल्यांदाच पूर आला. हिंगोली शहरात एका महिलेचे घर कोसळून नुकसान झाले. तर सेनगाव तालुक्यातील साखरा येथील सुभाष पिनगाळे यांच्या पिठाच्या गिरणी असलेल्या भागातील भिंत कोसळली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 243.30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी 30.59 आहे.
परभणी : जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी आणि बुधवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील 9 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मागील 24 तासांत सरासरी 48.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या हंगामातील दिवसभरातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे.
नांदेड : जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 53.60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल मंगळवारी रात्रीच्या सुमारास दमदार पाऊस झाल्यामुळे सहा तालुक्यांसह तब्बल 21 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तीन मंडळांत शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.
जालना : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळनंतर सर्वदूर पाऊस झाला. जालना तालुक्यातील विरेगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सहा मंडळांत 40 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 27.20 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
मराठवाड्यातील 47 मंडळांमध्ये अतिवृष्टी
औरंगाबाद, लातूर वगळता उर्वरित जिल्ह्यांतील 47 मंडळांमध्ये बुधवारी सायंकाळपर्यंत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ज्यात जालना जिल्ह्यातील विरेगाव (69 मिमी), बीड- कडा (65 मिमी), धाराशिव - नळदुर्ग (69 मिमी), वालवड (67 मिमी), डाळिंब (72 मिमी), जेवळी (72 मिमी), नांदेड- नांदेड शहर (76 मिमी), ग्रामीण (70 मिमी), विष्णुपुरी (69 मिमी), लिंबगाव (153 मिमी), नालेश्वर (88 मिमी), कुंडलवाडी (67 मिमी), माळाकोळी (77 मिमी), सोनखेड (80 मिमी), मोघाली (95 मिमी), मुखेड (76 मिमी), मुगत (65 मिमी), बारड (70 मिमी), कारखेळी (90 मिमी), जरीकोट (79 मिमी), उमरी (127 मिमी), गोळेगाव (133 मिमी), सिंधी (73 मिमी), धानोरा (66 मिमी), अर्धापूर (76 मिमी), दाभड (87 मिमी), माळेगाव (69 मिमी), परभणी- पेडगाव (72 मिमी) सांगवी (107 मिमी), बामणी (107 मिमी), आडगाव (78 मिमी), मोरेगाव (70 मिमी), हिंगोली- शहर (120 मिमी), नर्सी (122 मिमी), बसांबा (122 मिमी), दिग्रस (119 मिमी), मालहिवरा (81 मिमी), खंबाळा (126 मिमी), टेंभुर्णी (75 मिमी), औंढा (78 मिमी), येहलेगाव (78 मिमी), सालना (78 मिमी) व जवळा (76 मिमी). मराठवाड्यात आतापर्यंत 30.5 टक्के पाऊस झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Rain : राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज