(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidharbha Unseasonal Rain Update : अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे विदर्भातील पिकांचं मोठे नुकसान; वीज अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू
Vidharbha Unseasonal Rain: विदर्भात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, तूर, संत्री, भाजीपालासह कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
Nagpur News नागपूर : आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. राज्यातील काही भागांसह विदर्भात (Vidarbha) कोसळणाखऱ्या दमदार अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 2023 च्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे अगोदरच शेतकरी गारद झालेला आहे. त्यामुळे आता पुन्हा ढगाळ वातावरण आणि गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस झाल्याने सोंगून ठेवलेला हरभरा, गहू तसेच सोंगणीला आलेल्या गहू, हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या आवकाळी पावसाने रब्बी पिकावर देखील मोठा परिणाम होणार असून गहू, हरबरा, तूर, संत्री, भाजीपालासह कांदापिकाचे देखील मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
आवकाळी पावसाने रब्बी पिकावर मोठा परिणाम
नागपूर शहरासह विदर्भात सलग होणाऱ्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. या गारपिटीमुळे हरभरा गहू, तूर, भाजीपाला आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यात आधीच हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. वेचणीला आलेला कापूस पावसात भिजल्याने कापसाचा वाती झाल्या असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावून घेतल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि मेघ गर्जना होत दमदार पाऊस झाला. जवळपास एक तास जिल्ह्याच्या सर्वच भागात पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्ह्याच्या मुख्यालयी तसेच अनेक तालुक्यातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता. या आवकाळी पावसाने रब्बी पिकावर मोठा परिणाम होणार असून गहू, हरबरा, तूर , कांदापिकाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अंगावर वीज पडल्याने युवकाचा मृत्यू
तर शेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील एका युवकाचा अंगावर विज पडल्याने त्यात त्याचा मृत्यू झालाय. सूरज निंबाळकर असे मृत्य झालेल्या युवकाचे नाव असून तो सायंकाळी पेट्रोल पंपावर कामासाठी घरून निघाला होता. रस्त्यातच त्याच्या अंगावर विज कोसळली आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शेतकऱ्यांचा शेतमाल भिजला
अकोला जिल्ह्यासह बाळापुर तालुक्यात काही भागात अवकाळी पावसानं चांगलच झोडपलं आहे. काल रात्री 8 वाजेपासून जिल्ह्यातील उरळसह परिसरातील गावात अवकाळी पावसान हजेरी लावली. ग्रामीण भागात सध्या हरभरा सोंगणीला आला आहे. जेमतेम सोंगणीला सुरवात होणार तोच विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसमोर आस्मानी संकट उभे ठाकले आहे. वाशिमसह अन्य बाजार समित्यांच्या आवारात ओट्याखाली ठेवलेला शेतकऱ्यांचा शेतमाल भिजला. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई संबंधित प्रशासनाने करून द्यावी, अशी मागणी आता शेतकाऱ्यांकडून होत आहे.