(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्पर्धेत हरला, पण प्रेमात जिंकला... अमरावतीतील दिव्यांग जोडप्याची अनोखी प्रेम कहाणी
Amravati News : स्पर्धेत हरला, पण प्रेमात जिंकला... प्रेमाच्या बाबतीत हाच खरा बाजीगर ठरला. अमरावतीतील दिव्यांग जोडप्याची अनोखी प्रेम कहाणी.
Amravati News : प्रेम म्हणजे, प्रेम असतं... प्रेमाच्या अनेक व्याख्या आहेत. प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. प्रेमाचे भन्नाट किस्सेही आपण नेहमीच ऐकतो. प्रेम आंधळं असतं असंही म्हटलं जातं. अशाच एका प्रेमाची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही गोष्ट आहे अमरावतीत राहणाऱ्या एका तरुणाची. हा तरुण स्पर्धेत हरला पण प्रेमात जिंकला. या प्रेमकहानीतील एक महत्त्वाची बाब म्हणजे, या गोष्टीतले तरुण-तरुणी दोघेही दृष्टीहीन आहेत. पण त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा डोळसपणा मात्र सर्वांची मनं जिंकून जातो.
2016 मध्ये एका मराठी वाचन स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत तरुणीनं एका तरुणाला स्पर्धेत हरवलं. पण त्या तरुणानं या तरुणीला प्रेमात जिंकलं. एवढंच नाहीतर, काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लग्नगाठही बांधली आहे. विशेष म्हणजे, हे प्रेमीयुगुल दृष्टीहिन असल्यानं त्यांचा हा डोळस प्रेमविवाह सध्या अमरावती जिल्ह्यात विशेष चर्चेचा ठरला आहे. त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे, एसटी सेवा बंद असतानाही ती तरुणी थेट सांगलीहून एकटीच प्रियकराच्या प्रेमापोटी अमरावतीत आली. नुकताच त्यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
अमरावती जवळ असलेल्या माहुली जहागीर या गावातील राहुल बावणे असं प्रियकाराचं, तर आरती कांबळे असं प्रेयसीचं नाव आहे. गोंदिया याठिकाणी 2016 वर्षी दृष्टिहीन संघटनेच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ज्यापैकी एक स्पर्धा होती मराठी वाचन स्पर्धा. या स्पर्धेत राहुल आणि आरती दोघांनीही भाग घेतला होता. यास्पर्धेत आरतीनं राहुलला हरवलं. त्यानंतर याच कार्यक्रमात आरतीनं "जिवलगा दूर राहिले रे घर माझे" हे गाणं गायलं. आरतीनं गायलेलं हे गाणं राहुलला खूपच आवडलं. तेव्हापासून दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू फोनवरून त्यांच्यात संभाषण सुरु झालं. मैत्री वाढली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
दोघांच्या नात्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना समजलं. मात्र आरतीच्या कुटुंबियांनी विरोध केला. कुटुंबीयांनी आरतीचं घराबाहेर पडणंही बंद केलं. एकीकडे कुटुंबीयांचा विरोध तर दुसरीकडे राहुलच्या प्रेमाची ओढ, अशा द्विधा अवस्थेत आरती अडकली. मात्र राहुलने विवाह करण्याची तयारी दर्शवून तिला भावनिक आणि मानसिक आधार दिला. त्यामुळे तिच्यापुढील पेच सुटला. त्यानंतर तिने राहुलला भेटण्यासाठी अमरावतीत येण्याचा निर्णय घेतला आणि ती अमरावतीच्या दिशेने निघाली.
राज्यात एसटी कामगारांनी संप पुकारला होता. एसटी बंद असल्यानं तिची मोठी पंचाईत झाली होती. त्यामुळे ती एका ट्रॅव्हल्समध्ये बसली. 'इच्छा तिथे मार्ग' या उक्तीप्रमाणे त्या गाडीत अमरावतीला येणारा एक प्रवासी तिला भेटला आणि पुढचा प्रवास सुकर झाला. त्याच्या मदतीनं आरती अमरावतीत आली. इथे आल्यावर तिने राहुलला फोन केला. राहुल-आरतीची एवढ्या वर्षांनंतर भेट झाली. राहुलच्या कुटुंबीयांचा विवाहाला पाठिंबा असल्यानं मंगळवारी दोघांच्याही डोक्यावर अक्षदा पडल्या. त्यामुळे दोघांनीही आनंद व्यक्त केला.
आरती दोन्ही डोळ्यांनी दृष्टीहिन असली, तरीही ती उत्तम गायिका आहे. राहुल हा केंद्रीय लोकसेवा आयोगच्या परीक्षेची तयारी करीत आहे. दोघांनी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. दोघांचीही प्रेमकथा एखाद्या बॉलिवूडपटापेक्षा कमी नाही. बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरुख खानच्या चित्रपटातील एक डॉयलॉग आठवतो. 'हारकर भी जितनेवालो को बाजीगर कहते है' या डायलॉगप्रमाणे हा प्रियकरही खरचं प्रेमात 'बाजीगर' ठरलाय.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा