(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AAP Nagpur : मंगळवारी तलावाची दुर्दशा; आम आदमी पार्टीतर्फे मनपा सहायक आयुक्तांना घेराव
विविध वार्डांमध्ये स्वच्छता कर्मचारी नियमित येत नाही. तर अनेक मोकळ्या भूखंडांवर कचरा आणि पाणी असल्याने नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.
नागपूरः शहरातील नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणाऱ्या मंगळवारी तलावाची दुर्दशा झाली असून याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. वर्षभरापूर्वीच तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी 16 लाख 55 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तरी आतापर्यंतही कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्याने आम आदमी पार्टी नागपूरतर्फे सतरंजीपुरा झोनच्या सहायक आयुक्तांचा घेराव करण्यात आला.
आपचे विजय नंदनवार यांचा नेतृत्वात मोठ्यासंख्येत कार्यकर्ते मनपाच्या झोन कार्यालयात पोहोचले आणि कामाच्या प्रगतीबाबत सहायक आयुक्तांना जाब विचारला. तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी गेल्यावर्षी आपतर्फे 9 ऑगष्ट क्रांती दिनापासून 42 दिवस साखळी उपोषण करण्यात आले होते. यावेळी मनपाच्यावतीने निधी मंजूर करुन लवकरात लवकर काम करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप काम सुरु झाले नसल्याने आपचे कार्यकर्ते झोन कार्यालयावर धडकले.
यावेळी आपतर्फे रोशन डोंगरे, प्रदिप पौनिकर, डॉ. अमेय नारनवरे, नरेश महाजन, ऍड. सौरभ दुबे, नानक धनवाणी, हरेश निमजे, पंकज मेश्राम, अनिल संभे, अरुण गुणारकर, सुनील गजभिये, अब्दुल सलाम, नासीर शेख, किशन निमजे, पंकज मिश्रा, माणशिंग अहिरवार, प्रमोद चौधरी, विशाल वैद्य, जावेद मालाधारी, मीना निमजे, किशन रणदिवे, सेवकरांम निमजे, छबी निमजे उपस्थित होते.
प्रशासकांचे दुर्लक्ष
मनपाच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यावर सध्या मनपाच्या कारभारावर प्रशासक राधाकृष्णन बी. यांचे नियंत्रण आहे. मात्र मनपाच्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकांचे नियंत्रण नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विविध वार्डांमध्ये स्वच्छता कर्मचारी नियमित येत नाही. तर अनेक मोकळ्या भूखंडांवर कचरा आणि पाणी असल्याने नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर मनपाद्वारे कारवाई करण्यात येत नसून उलट बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन मनपाचे एनडीएस पथक दंडात्मक कारवाई करण्यात व्यस्त आहेत.
अभियानासाठीच स्वच्छता
शहरात मनपाद्वारे फक्त स्वच्छता सर्वेक्षण असतानाच स्वच्छतेला गांभीर्याने घेण्यात येते. मात्र नियमित सफाईकडे दुर्लक्ष करण्यात येते. पावसामुळे एकीकडे मनपाच्या पावसाळ्यापूर्व तयारीचे पितळ उघडे पडले आहे. मनपा नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
PM Narendra Modi : नरेंद्र मोदी यांची संपत्ती 26 लाखांनी वाढली, एकूण संपत्ती 2.23 कोटींवर
'आप'चे लक्ष्य मनपा
गेल्या काही वर्षांपासूुन दिल्लीबाहेरही आम आदमी पार्टी विविध निवडणूकांमध्ये उमेदवार देत असून त्यांच्या प्रचारासाठीही आप नेते येत असतात. नागपूरमध्येही आगामी मनपा निवडणूकांकडे लक्ष केंद्रीत करुन आपने इच्छुकांना आपल्या विभागात सक्रिय होण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पार्टी नागरिकांचे विविध मुद्दे घेऊन आक्रमक होताना दिसत आहे. आपच्या दोन मोठ्या नेत्यांनीही नागपूरला भेट दिली होती.