(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांची ईडी अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाची तक्रार
नागपुरातील अजनी पोलीस स्टेशनमध्ये (Nagpur Ajni Police Station) ईडीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर: ईडीच्या (ED) अटकेत असलेले नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके (Satish Uke) आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांच्या आई पुष्पा उके यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप केला आहे. नागपुरातील अजनी पोलीस स्टेशनमध्ये (Nagpur Ajni Police Station) ईडीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
22 नोव्हेंबर रोजी ईडीचे अधिकारी अचानक घरी आले आणि घराची झडती घेत असताना त्यांनी सोबत कोणतीही महिला अधिकारी किंवा कर्मचारी आणले नव्हते. उके कुटुंबातील महिला स्वच्छतागृहात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी थेट घरात आतमध्ये प्रवेश केला. कुटुंबातील महिलांच्या मनात लज्जा येईल अशी स्थिती निर्माण केली. त्यामुळे ईडीचे अधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या तक्रार अर्जाच्या माध्यमातून उके कुटुंबाने केली आहे. दरम्यान या घटनेमुळे सध्या विविध चर्चा रंगल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांमुळे उके चर्चेत
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर आरोप करत न्यायालयात खटले दाखल केल्यानंच उके यांचं नाव चर्चेत आलं होतं. आपल्या साथीदारांच्या मदतीनं शस्त्राचा धाक दाखवत बोखारा येथील साडेपाच एकर भूखंड बळकावल्याचा गुन्हा अजनी सिताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ईडीनं उकेंविरोधात चौकशी सुरू केली होती. नागपुरात तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अॅड. उके आणि त्यांच्या भावाला अटक केली.
जमीन गैरव्यवहार प्रकरणी सतीश उके नागपूर पोलिसांच्या रडारवर
जमीन गैरव्यवहार प्रकरणी सतीश उके नागपूर पोलिसांच्या रडारवर होते. 2018 साली त्यांना एका जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकही झाली होती. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोन महिन्यांची शिक्षा सुनावल्यानंतरही ते पोलिसांना शरण न आल्याने त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही नागपूर खंडपीठाने दिले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवल्याचा आरोप करत सतीश उकेंनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.2014 च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी कोर्टानं फडणवीसांना दोषमुक्त केलं. सध्या जेलमध्ये असलेले अॅड. सतीश उके यांनी नागपूर कोर्टात ही याचिका केली होती. जे गुन्हे लपवले त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नव्हता, असं कोर्टानं स्पष्ट केलं.
हे ही वाचा :