Jalna : अंतरवाली सराटी दगडफेकीतील आरोपी अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष, खोटा गुन्हा नोंदवल्याचा आरोप, विजयसिंह पंडित काढणार मोर्चा
Antarwali Sarathi Lathicharge : ऋषिकेश बेदरे हा अजित पवार गटाचा युवक तालुकाध्यक्ष असून त्याच्यावर खोटा गुन्हा नोंदवण्यात आल्याचा आरोप विजयसिंह पंडित यांनी केला आहे.
बीड : अंतरवाली सराटी (Jalna) येथे पोलिसांवर दगडफेक केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेला ऋषिकेश बेदरे (Rushikesh Bedre) हा अजित पवार गटाचा राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष असल्याचं समोर आलं आहे. ऋषिकेश बेदरेवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सोमवारी सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली गेवराई तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी अजित पवार गटाचे नेते विजयसिंह पंडित (Vijaysinh Pandit) यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
अंतरवाली सराटी येथे पोलिसांवर झालेल्या दगडफेकीनंतर अंबड पोलिसांनी गेवराईमधून अजित पवार राष्ट्रवादी गटाचे युवक तालुका अध्यक्ष ऋषिकेश बेदरे आणि त्याच्या दोन साथीदाराला अटक केली. याच अटकेचा निषेध करण्यासाठी सोमवारी गेवराई शहरामध्ये अजित पवार गटाचे नेते विजयसिंह पंडित आणि मराठा बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
ऋषिकेश बेदरे आणि त्याच्या दोन साथीदारांची अटक म्हणजे गेवराईतील काही नेत्यांनी पूर्ववैमनष्यातून रचलेला हा कट असल्याची प्रतिक्रिया अजित पवार गटाचे नेते विजयसिंह पंडित यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विजयसिंह पंडित यांनी केली असून बेदरेवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत असंही त्यांनी म्हटलंय.
ऋषिकेश बेदरे हा अजित पवार गटाचा राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष असून मराठा आरक्षण आंदोलनामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. आंतरवाली सराटीमध्ये जेव्हा पोलिसांवर दगडफेक झाली त्यामध्ये ऋषिकेश बेदरी याला मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक बंदूक आणि जिवंत काडतूसदेखील जप्त केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नितेश राणेंनी केला फोटो शेअर
भाजप आमदार नितेश राणे यांनी दगडफेक प्रकरणात अटक झालेला ऋषीकेश बेदरे आणि शरद पवारांचा एक फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो ट्वीट करताना दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? असा सवाल देला आहे.
दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? पवार साहेब, पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. नितेश राणेंनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये दगडफेकीतील मुख्य आरोपी हृषीकेश बेदरे, शरद पवार, राजेश टोपे आहे. नितेश राणे म्हणाले, 1 सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर तीन सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?
ही बातमी वाचा: