Ramdas Athawale: विधानसभेसाठी आठवलेंनी फुंकलं रणशिंग, भाजपकडे केली इतक्या जागांची मागणी, प्रकाश आंबेडकरांनाही दिली मोठी ऑफर
Ramdas Athawale: वंचित बहुजन आघाडीला राज्यात म्हणावे तितके यश मिळालेले नाही. आम्ही लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या, मात्र मिळाल्या नाहीत, असंही ते यावेळी म्हणालेत.
नागपूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटप आणि उमेदवारी यांची चर्चा सुरू आहे, अशातच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी जागांची मागणी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आठवलेंनी (Ramdas Athawale) मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला किमान 10 ते 12 जागा द्याव्या, माझ्या पक्षासोबत मोठ्या प्रमाणात दलित मतदार आहेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रामदास आठवलेंनी किती जागांची केली मागणी?
वंचित बहुजन आघाडीला राज्यात म्हणावे तितके यश मिळालेले नाही. आम्ही लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या, मात्र मिळाल्या नाहीत. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला 12 जागा द्याव्यात. विदर्भात किमान 4 जागा द्याव्या. महाराष्ट्रात आम्ही 18 जागांची यादी केली आहे. त्यापैकी 12 जागा द्याव्या. आम्हाला भाजपच्या कोट्यातून मानू नये, तर भाजप, शिंदे आणि अजित दादा तिघांनी आम्हाला त्यांच्या कोट्यातून 4 - 4 जागा द्याव्या, म्हणजे आम्हाला 12 जागा मिळतील. येणाऱ्या एनडीए सरकारमध्ये आम्हाला मंत्री पद द्यावे, तसेच 2 महामंडळ दावे अशी मागणी आठवलेंनी (Ramdas Athawale) केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चतुर नेते आहे. ते आमची ताकत ओळखतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
महायुतीत आधीच तिन पक्षात जागांची मारामारी असताना तुम्हाला 12 जागा आणि प्रत्येकाच्या कोट्यातून 4 जागा कशा मिळणार या प्रश्नावर बोलताना, महायुतीत सर्व पक्षांच्या जागांच्या मागण्या आहेत. मी काही अवास्तव मागणी केलेली नाही. मी 12 जागा मागितल्या आहे. चर्चेत याबद्दल काही कमी जास्त होऊ शकते. या जागा मात्र आम्ही आमच्या चिन्हावर लढवू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगळ्या चिन्हावर लढल्या तर चालतील, मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्ही आमच्या चिन्हावर लढवू, असंही आठवले (Ramdas Athawale) म्हणालेत.
प्रकाश आंबेडकर यांनी अनेक निवडणूक लढून ही त्यांच्या जागा निवडून येत नाही. त्यामुळे मी एकदा म्हणालो होतो, की त्यांनी एनडीएमध्ये यावे, त्यांच्या जागा ही निवडून येतील. त्यांना मंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करेल. 1990 मध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते, तर आमच्या किमान दहा-बारा जागा निवडून आल्या असत्या आणि उपमुख्यमंत्री पद आम्हाला मिळालं असतं. मात्र, तेव्हा ते आमच्या सोबत आले नाही. प्रकाश आंबेडकर यांनी थोडं सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. प्रकाश आंबेडकर यांनी समजून घेतले पाहिजे ते एकटे लढून सत्तेत येऊ नाही, त्यांनी आघाडी करणे आवश्यक आहे, असंही आठवले म्हणालेत.
एकटा असल्याने दलितांना सत्तेत हवा तेवढा वाटा मिळत नाही...
मी आणि प्रकाश आंबेडकर सोबत आलो तर महाराष्ट्राचे राजकारणात बरेच काही घडवू शकते. मी एकटा असल्याने दलितांना सत्तेत हवा तेवढा वाटा मिळत नाही. आम्ही दोघे एकत्रित आलो, तर ते होऊ शकेल. मात्र, त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी सोबत आले पाहिजे. मी काही वंचित बहुजन आघाडीमध्ये जाणार नाही. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पक्षाचे नाव बदलायला नको होतं. त्यांनी रिपब्लिकन पक्ष चालवायला हवं होतं. बहुजनांना एकत्रित करण्याच्या त्यांच्या मताशी मी सहमत आहे.
रामदास आठवले प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याचा दिला प्रस्ताव
रिपब्लिकन पक्षाचा एकत्रीकरण एखाद्या गटाने (खोब्रागडे गटाने) करून होणार नाही. त्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना सोबत आणणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय झालेला एकत्रीकरण समाजाला मान्य झालं नाही. प्रकाश आंबेडकर सोबत आले, तर त्या एकत्रीकरणासाठी मी तयार आहे. मला कुठलंही पद नको प्रकाश आंबेडकर यांना अध्यक्ष केलं तरी चालेल, असं म्हणत रामदास आठवले प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच रिपब्लिकन ऐक्याच्या प्रस्तावासंदर्भातही सकारात्मक भूमिका जाहीर करत प्रकाश आंबेडकर अध्यक्ष झाले तर मला चालेल अशी भूमिका जाहीर केली आहे.प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय रिपब्लिकन ऐक्य शक्य होणार नाही हेही आठवले म्हणाले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली. मला तीन वेळेला मोदी सरकार मध्ये मंत्रीपद मिळाले, कार्यकर्त्यांमुळे हे झाले. मला रिपब्लिकन पँथरच्या काळापासून नागपूर आणि विदर्भाने भक्कम साथ दिली. सध्या ज्या सरकारमध्ये आहे, ते पाच वर्ष चालणारे सरकार असून पूर्ण बहुमत आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आमच्या सोबत असून पुढे ही सोबत राहतील. पूर्वी ही असे सरकार चालले आहे, असा विश्वास यावेळी रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला आहे.