Nitin Gadkari Threat Call : गडकरी धमकी प्रकरणाचा संपूर्ण तपास मागणाऱ्या NIA च्या अर्जावर उद्या सुनावणी, तर नागपूर पोलीस शाकीर-पाशाची समोरासमोर चौकशी करणार
Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आणि खंडणी प्रकरणाचा तपास संपूर्णपणे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे अर्थात द्यावा, अशी मागणी करणाऱ्या एनआयएच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे
Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी आणि खंडणी प्रकरणाचा तपास संपूर्णपणे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे अर्थात (NIA) द्यावा, अशी मागणी करणाऱ्या एनआयएच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. गडकरी यांच्या कार्यालयात धमकी देऊन खंडणी मागितल्याच्या प्रकरणाचा तपास आणि दोन्ही आरोपी सोपवण्यासाठी एनआयएने नागपूरच्या विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायाधीश सुट्टीवर असल्याने आज सुनावणी झाली नाही. एनआयएला हे प्रकरण त्यांच्या तपासासाठी हवे आहे, शिवाय प्रकरणातील सर्व आरोपी, कागदपत्रेही त्यांना हवी आहेत. नागपुरात (यूएपीए कायद्यांतर्गत) दाखल असलेले दोन्ही प्रकरण मुंबईत स्पेशल कोर्टात हस्तांतरीत करुन घ्यायचे आहे.
दोन दशकांपूर्वी अफसर पाशा नागपुरात आला होता
लष्कर ए तोयबाचा दहशतवादी बशीरुद्दिन उर्फ अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन समोर आलं आहे. दहशतवादी अफसर पाशा दोन दशकांपूर्वी नागपुरात आला होता आणि काही दिवस नागपुरात वास्तव्याला होता, असे त्याच्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. मात्र तेव्हा तो नागपुरात का आला होता, कुठे आणि किती दिवस राहिला होता याची चौकशी आता नागपूर पोलिसांना करावी लागणार आहे. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. हे प्रकरण एनआयएकडे गेल्यानंतर त्यांची टीम चौकशी करणार आहे.
शाकीर आणि अफसर पाशाची समोरासमोर चौकशी करणार
गडकरी यांच्या कार्यालयात 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी आलेल्या धमकीचे कॉल करणारा जयेश पुजारी उर्फ शाकीर आणि त्याला फोन करायला लावणारा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी अफसर पाशा हे दोघे सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. नागपूर पोलीस दोघांनी हे कृत्य का केले होते, या मागे आणखी काही लोक आहेत का हे जाणून घेण्यासाठी दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करणार आहे. "या प्रकरणात पहिला आरोपी जयेश पुजारी आणि अफसर पाशा दोघांचा कट होता अशी माहिती आम्हाला मिळाली आहे त्यामुळे दोघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या जयेश पुजारीचा पुन्हा पीसीआर मागितला जाऊ शकतो," अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
अफसर पाशाला शनिवारी नागपुरात आणल्यानंतर पोलिसांनी काल वैद्यकीय तपासणी तसंच फिंगरप्रिंट्स घेणे आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. आजपासून त्याची चौकशी सुरु केली जाईल. अफसर पाशाला 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. बेळगाव जेलमधील काही आरोपींचीही नागपूर पोलिसांनी चौकशी केली. तिथे पण नागपूर पोलिसांचा तपास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेशी समन्वय ठेऊन या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
एनआयएकडून बंगळुरुमध्ये गुन्हा दाखल
तिकडे एनआयएनेही बंगळुरुमध्ये यासंदर्भात एक गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तपासाचा व्याप मोठा असल्याने आणि धमकीचे हे प्रकरण अनेक राज्यांपर्यंत पसरलेले असल्याने एनआयएने नागपूरच्या दोन्ही गुन्ह्यांच्या तापसासह संपूर्ण प्रकरण तपासासाठी मागितले आहे. त्यांना प्रकरणातील सर्व आरोपी, कागदपत्र ही हवे आहे.. त्यासाठीच त्यांनी नागपुरातील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केले असून त्यावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा