मग्रुर बुलेट चालकाची शायनिंग पोलिसांनी उतरवली, ठोठावला मोठा दंड
नागपुरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बुलेट चालकाची मस्ती वाहतूक पोलिसांनी जिरवली आहे. या तरुणाला तब्बल 10 हजारांचा दंड पोलिसांना ठोठावला आहे.
नागपूर : वाहतूक पोलीस उपायुक्तांसमोर मग्रुरी दाखवणाऱ्या एका बुलेट चालकाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. या चालकाचे शौक जेवढे मोठे होते, तेवढाच मोठा त्याला ठंड ठोठावण्यात आला आहे. नागपूर नव्हे तर संपूर्ण विदर्भात या दंडाची चर्चा आहे आणि आजवर सर्वाधिक दंड भरणारा हा दुचाकी चालक असू शकतो.
रस्त्यावर जोरात गाडी पळवताना सायलेन्सरमधून ब्लास्टिंगचे मोठे आवाज काढणाऱ्या बुलेट गॅंगच्या उन्मादापासून नागपूर पोलीस आधीच त्रस्त होते. काल संध्याकाळी नागपूरचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित गस्त घालत होते. त्यावेळी कडबी चौक ते मंगळवारी बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंकुश कांबळे नावाचा तरुण वाहतूक नियमांची ऐशी तैशी करत विनाहेल्मेट रॉंग साईडने बुलेट दामटत जाताना उपायुक्तांना दिसला. चिन्मय पंडित यांनी त्याला थांबवलं, मात्र अंकुशने मग्रुरीने बुलेटच्या सायलेन्सरमधून ब्लास्टिंगचे आवाज काढत पळ काढला. चालकाची मग्रुरी पाहून चिन्मय पंडितांनी त्याचा पाठलाग सुरु केला. वाकीटॉकीवर आपल्या टीमला अलर्ट केले आणि काही अंतरावर बुलेट चालकाला पकडण्यात आलं.
पोलिसांनी अंकुश कांबळेला विचारणा केली तर त्याने अरेरावी करत उत्तरे दिली. त्याच्या बुलेटच्या दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट गायब होत्या. एका नंबर प्लेटवर 'मेरी आदत बुरी नहीं, बस शौक थोडे ऊचे है' असं लिहिलं होतं. त्यामुळे ही गाडी चोरीची तर नाही, असा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी विचारणा केल्यावर अंकुशने 'शौक बडी चीज है' असं म्हणत पोलिसांना उलट उत्तर दिलं. मग काय, पोलिसांनीही त्याच्या बुलेटचा चांगलाच पंचनामा केला. कायद्याचे एकेक नियम पाळत बुलेटमधील नियमांचे उल्लंघन शोधून काढले. बुलेट चालकाने हेल्मेट न घालता रॉंग साईड बुलेट तर चालवलीच होती. शिवाय बुलेटमध्ये अनेक नियमबाह्य बदल केले होते. दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट गायब होत्या. बुलेटचं सायलेन्सर बदलवून त्याच्यातून गोळी सुटल्यावर जसा मोठा आवाज होतो, तसा आवाज काढणारा बंदी असलेला 'पंजाब सायलेन्सर' बसवण्यात आला होता. कर्कश आवाज काढणारा हॉर्न बसवला होता. शिवाय गाडीची कागदपत्रही नव्हती.
पोलिसांनी अंकुशच्या सर्व उल्लंघनासाठीचे दंड मोजले तर ती रक्कम 10 हजार 300 रुपयांवर गेली. त्यानंतर पोलिसांनी अंकुशची बुलेट जप्त केली होती. आज अंकुशने पोलिसांकडे येऊन दंड भरला आणि त्याची बुलेट सोडवून नेली आणि आपली चूकही मान्य केली. तसेच नागपूरच्या सर्व तरुणांना अशा चुका न करण्याचा मोफत सल्लाही त्याने दिला.महाराष्ट्रात अजून नवं मोटार वाहन कायदा अमलात आला नाहीये. त्या कायद्यात वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी दंड वाढवण्यात आलेला आहे. मात्र पोलिसांनी ठरवलं आणि बारकाईने जुन्या कायद्याची अंमलबजावली केली तर मोठा दंड आकारुन वाहनचालकांचं डोकं ठिकाण्यावर आणता येऊ शकतं, हेच या प्रकरणातून दिसून आलं.