Chandrashekhar Bawankule : दुय्यम निबंधकाच्या तक्रारी, महसूलमंत्र्यांची अचानक भेट अन् झाडाझडती, सावनेरमध्ये प्रशासनाची धावपळ
Chandrashekhar Bawankule : सावनेर दुय्यम निबंधक कार्यालयात अनेक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी महसूलमंत्री बावनकुळे यांना प्राप्त झाल्या. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक भेट दिली.

नागपूर : जिल्ह्यातील सावनेर येथील दुय्यम निबंधकाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यालयास अचानक भेट दिली आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. यापुढे तक्रारी आल्यास, काही गैरव्यवहार झाल्याचं आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला. बावनकुळेंच्य अचानक भेटीमुळे सावनेर प्रशासनाची मात्र धावपळ झाल्याचं दिसून आलं.
राज्यभरात महसूल विभागात शेतकरी आणि सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो अशी नेहमीच ओरड असते. अगदी ग्रामपंचायत, तलाठी ते तहसीलदार अशा अधिकाऱ्यांकडून असा त्रास दिला जातो. शेतकरी आणि नागरिकांकडून कधी पैशांची मागणी केली जाते, तर कधी किरकोळ कामासाठीही अनेक हेलपाटे लावले जातात. त्यातच, खरेदी-विक्री कार्यालयातही नागरिकांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केल्या जात असल्याच्या अनेकदा तक्रारी येतात.
तक्रारी आल्या तर कारवाई करणार
नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यात हजारो तक्रारी आलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात महसूलमंत्री बावनकुळे यांची अचानक भेट दिली. बावनकुळे यानी यावेळी लोकांच्या तक्रारींबाबत असलेल्या फाईल्सची तपासणी केली.
महसूलमंत्री कार्यालयात अचानक पोहचल्याने प्रशासनात खळबळ उडाल्याचं दिसून आलं. कामात गैरप्रकार आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिला.
यापूर्वीही नागपुरातील दोन दुय्यम निबंधक कार्यालयात शेकडो कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. सावनेर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातही गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी महसूलमंत्री बावनकुळे यांना प्राप्त झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड IIM साठी 70 एकर जमीन
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ उभारणीचा ‘श्रीगणेशा’ करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सकारात्मक कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. तर, महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडून जागा उपलब्धतेस हिरवा कंदील दर्शवण्यात आला. देशातील नामांकित भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM-नागपूर) ची शाखा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. महसूल विभागाकडून तब्बल 70 एकर जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा निर्णय घेतला.
























