Nagpur : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 5 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू, काटोलमधील धक्कादायक घटना
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील काटोल शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या धंतोली भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील काटोल शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या धंतोली भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. विराज जयवार हा पाच वर्षीय मुलगा त्याच्या मोठ्या बहिणीसह घरासमोर फिरत असताना त्याच्यावर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. घाबरलेल्या विराजने धावून जात स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मोठी बहीण जिवाच्या आकांताने आरडाओरड करू लागली. मात्र, कुत्र्याने पाठलाग करत विराजला पकडले. पाहता पाहता दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी विराजवर हल्ला केला. आणि काही अंतरापर्यंत त्याला ओढत नेलं. जवळच एका निर्माण कार्यासाठी वाळू साठवलेली होती, कुत्र्यांनी विराजला त्या ठिकाणी ओढत नेऊन त्याचे लचके तोडले. वस्तीतील नागरिक जोवर विराजला वाचवण्यासाठी धावत त्या ठिकाणी पोहोचले, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
नागरिकांच्या तक्रारीकडे स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष
मिळालेल्या माहिती प्रमाणे वस्तीतील नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळेला भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबद्दल नगरपरिषद तसेच स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली होती. डुकराचे पिल्लू, शेळीचे पिल्लू यांच्यावर हल्ला करत त्यांच्या जीव घेण्यापर्यंत कुत्र्यांची मजल गेली होती. तसेच गेले अनेक दिवस हे भटके कुत्रे नागरिकांवरही हल्ले करत होते. मात्र प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यामुळे आज विराजचा मृत्यू झाल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
पाच महिन्यात नागपुरातील दुसरी घटना -
नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट मध्ये जानेवारी महिन्यात अंजली रावत या बालिकेला ही अशाच पद्धतीने भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत जीवे मारले होते. अशा घटनांमध्ये वाढ होत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बालकाचा जीव गेल्यानंतर आता तरी प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.