(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NMC Fire Department : अग्निशमन विभागात 'फायरमॅन'ची वानवा; मंजूर 500 पदांपैकी फक्त 47 उपलब्ध
Nagpur News : सद्यस्थितीत अग्निशमन विभागाला कमितकमी 346 फायर मॅनची आवश्यकता आहे, मात्र केवळ 47 फायरमॅनच आगीचा सामना करत आहेत.
Nagpur News : एकीकडे शहराचा वेगाने विकास होत असून शहर पसरत चालले आहे, गगनचुंबी इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. महानगर पालिकेकडून बहुमजली इमारतींना मंजुरीही दिली जात आहे. मात्र दुसरीकडे एखादी आपत्ती आल्यास ज्यांची सर्वाधिक गरज आहे त्यांच्या नियुक्तीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. अग्निशमन विभागात मोठ्या प्रमाणात फायर मॅनचा (Firemen) वानवा आहे. अशात एखादी आपातकालीन स्थिती आली तर त्याच्याशी दोन हात कोण करणार याबद्दल कोणीही विचार केलेला दिसत नाही. गेल्या दशकापासून अग्निशमन विभागात फायर मॅनची नियुक्ती झालेली नाही. नियमानुसार शहरातील अग्निशमन केंद्रांमध्ये मंजूर पदांची संख्या 500 आहे. सद्यस्थितीत विभागाला कमितकमी 346 फायर मॅनची आवश्यकता आहे. मात्र केवळ 47 फायरमॅनच आगीचा सामना करत आहेत.
म्हणून सेवा प्रभावित
फायरमॅनची 299 पदं रिक्त आहेत. आपत्कालीन सेवांमध्ये अग्निशमन विभागाची मुख्य भूमिका असते. कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास पोलिसानंतर सर्वात प्रथम अग्निशमन विभागच मदतकार्याला लागतो. अनेकदा तर प्राकृतिक आपत्तीत केवळ अग्निशमन विभागावरच मुख्य जबाबदारी असते. अशात पुरेसे संसाधन मिळाले नाहीतर सेवा प्रभावित होणे स्वाभाविक आहे.
दहा वर्षांपूर्वी झाली होती शेवटची भरती
वर्ष 2004 मध्ये मोठ्या प्रमाणावर अग्निशमन विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. तेव्हापासून या विभागात भरती झाली नाही. जसजसं शहर विकसित झालं तसतसं या सेवेकडेही प्राधान्य देणे गरजेचे होते. मात्र ना नागपूरकर महानगरपालिकेचे अधिकारी आणि ना एकाही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले. बॅकलॉग भरण्यासाठी अग्निशमन विभागात वर्ष 2012 मध्ये शेवटची 24 जवानांची भरती घेण्यात आली होती. तेव्हापासून नंतर कोणतीही नियुक्ती झाली नाही, हे विशेष.
कंत्राटीतत्वावर भरती केले 59 कर्मचारी
अग्निशमन विभागाची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. वेळोवेळी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला जातो, मात्र याला गंभीरतेने घेतले जात नाही. अशात कोरोनाने विभागाची स्थिती आणखी खस्ता केली. कायमस्वरुपी नियुक्तीवर प्रतिबंध लावण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळांतर्गत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 59 जणांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. त्यांची विभागाला बरीच मदत होत आहे. आपला जीव धोक्यात घालून आगीपासून बचाव कार्य करणाऱ्या या जवानांचे भविष्य अंधकारात आहे. मोठ्या संख्येत तरुणांनी फायर अँड सेफ्टी आणि फायर इंजिनिअरिंगमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु कायमस्वरूपी नियुक्त्याच होणार नाहीतर शिक्षण घेऊन काय उपयोग.
पद | पाहिजे | रिक्त |
केंद्र अधिकारी | 11 | 10 |
उपअधिकारी | 30 | 25 |
अग्रगण्य फायरमन | 56 | 35 |
चालक ऑपरेटर | 112 | 47 |
वाहन चालक | 7 | 7 |
इतर महत्त्वाच्या बातम्या