Nagpur News : खासगी कंपनीच्या पार्टीत अश्लील नृत्य, नागपुरातील पंचतारांकित हॉटेलमधला प्रकार
Nagpur News : नागपूरच्या (Nagpur) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अश्लील नृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. पार्टी दरम्यान तिथे उपस्थित कर्मचारी अश्लील नृत्य करणाऱ्या महिलांवर पैशांची उधळण करत होते.
Nagpur Party Dance : नागपूरच्या (Nagpur) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अश्लील नृत्य (Obscene Dance) केल्याचा प्रकार समोर आला आहे. सौरऊर्जा उपकरणे तयार करणाऱ्या एका कंपनीने पार्टीचे (Party) आयोजन केले होते. त्या पार्टीमध्ये हा धक्कदायक प्रकार घडला आहे. पार्टी दरम्यान तिथे उपस्थित कर्मचारी अश्लील नृत्य करणाऱ्या महिलांवर पैशांची उधळण करत होते. या पार्टीतील हे व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर हॉटेल व्यवस्थापक आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
कंपनीसाठी चांगलं काम करणाऱ्यांना डीलरसाठी नागपूरच्या वर्धा रोडवरील शहराच्या वेशीवर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये या पार्टीचे आयोजन झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्टीत नागपुरातील डीलर्स सहभागी झाले होते. त्यातच अश्लील नृत्य केल्याचा प्रकार घडला. या पार्टीत तोकडे कपडे घालून राज्याबाहेरील आठ ते दहा तरुणी डान्स करत होत्या. तर त्याचवेळी पार्टीत उपस्थित असलेले कर्मचारी त्यांच्यावर पैशांची उधळण करत होते. या व्हिडीओमध्ये कॉर्पोरेटमध्ये कर्मचारी तरुणींच्या अश्लील नृत्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. तरुणींसाठी शिट्ट्या वाजवत होते. काही कर्मचारी अति उत्साहाच्या भरात तरुणींना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते तर अनेक जण आपल्या मोबाईल फोनमध्ये त्यांचे अश्लील नृत्य रेकॉर्ड करत होते.
पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. या पार्टीतील अश्लील नृत्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात कारवाईला सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे.
नागपुरात याआधीही पार्टीत अश्लील नृत्याचा प्रकार
दरम्यान नागपुरातील हॉटेलमध्ये अश्लील डान्स केल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या उमरेड करांडला इथल्या एका हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने अश्लील नृत्य आणि पैशांची उधळण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसानी कारवाई केली होती.
नागपूर पोलिसांच्या निर्देशांना केराची टोपली!
दरम्यान नागपूर पोलिसांनी हॉटेलमध्ये आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांना कडक दिशानिर्देश दिले आहेत. तरीही शहरातील नामांकित हॉटेलमध्ये असे कार्यक्रम आयोजित होत आहेत. नियमांना केराची टोपली दाखवत अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या हॉटेल मालकावर आता काय कारवाई होणार ते पाहावं लागणार आहे.
Nagpur Party Dance : नागपुरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अश्लील डान्स ABP Majha