Nagpur News : मुंबई-रांची विमान प्रवासादरम्यान प्रवाशाला रक्ताची उलटी; नागपूरमध्ये इमर्जन्सी लॅण्डिंग, उपचारांआधी प्रवाशाचा मृत्यू
नागपूर : नागपूर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. विमानात प्रवाशाला रक्ताची उलटी झाल्याने विमानाचे सोमवारी (21 ऑगस्ट) रात्री आठ वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर लॅण्डिंग करण्यात आलं.
नागपूर : नागपूर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग (Emergency Landing) करण्यात आलं. विमानात प्रवाशाला रक्ताची उलटी झाल्याने विमानाचे सोमवारी (21 ऑगस्ट) रात्री आठ वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) लॅण्डिंग करण्यात आलं. प्रवाशाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या प्रवाशाचा मृत्यू झाला. यानंतर विमान रांचीसाठी रवाना झाले. देवानंद तिवारी (वय 62 वर्ष) असं मृत प्रवाशाचं नाव आहे.
आधी तब्येत बिघडली आणि मग रक्ताची उलटी झाली
इंडिगो एअरलाईन्सच्या (IndiGo) मुंबई ते रांची विमान क्रमांक 6E 5093 मध्ये हा प्रकार घडला. विमान प्रवासादरम्यान देवानंद तिवारी यांना रक्ताची उलटी झाली. मुंबईहून रांचीला जाणाऱ्या प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. अखेरीस नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. परंतु उपचाराआधीच त्या प्रवाशाचा मृत्यू झाला.
अन् विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग केलं
देवानंद तिवारी इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात प्रवास करत होते. त्यांना किडनीचा त्रास होता आणि त्यांना टीबी देखील होता. प्रवासादरम्यान त्याची तब्येत अचानक बिघडली. त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. परिणामी विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं.
विमान नागपूरच्या विमानतळावर उतरण्यानंतर देवानंद तिवारी यांना पुढील उपचारांसाठी, विमानतळावर तैनात किम्स-किंग्सवे रुग्णालयाच्या अॅम्ब्युलन्समधून सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आला. डीजीएम (ब्रॅण्डिंग अँड कम्युनिकेशन्स) एजाज शमी यांनी ही माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी नागपूर विमातळावर वैमानिकाचा मृत्यू
17 ऑगस्ट रोजी नागपूर विमानतळावर उड्डाण करण्याआधी एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता. पायलट इंडिगो एअरलाईन्सचा होता. त्याचं नाव कॅप्टन मनोज सुब्रमण्यम होता. तो नागपूरहून पुण्यासाठीच्या विमानासाठी उड्डाण करणार होता. परंतु विमानतळाच्या बोर्डिंग गेटजवळ तो अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाला. या घटनेनंतर विमातळावर एकच खळबळ माजली होती.
हेही वाचा