Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही, कधी घेणारही नाही; बावनकुळेंची स्पष्टोक्ती
Nagpur News: ओबीसींसह इतर समाजावर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकारने कधी घेतलेलाही नाही आणि कधी घेणार देखील नाही. अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Nagpur News: नागपूर : राज्य सरकार आणि पक्ष ओबीसी (OBC) समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिले पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट आहे. या सोबतच ओबीसींसह इतर समाजावर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकारने कधी घेतला नाही आणि कधी घेणार देखील नाही. राज्यातील सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि महायुती सरकार आधीपासूनच सकारात्मक होते.
विरोधी पक्षाचे लोक संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातून मराठा आणि ओबीसी यापैकी कोणीही नाराज होणार नाही, असा तोडगा काढला असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.
राज्यातील सर्व समाजाला न्याय
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात नोंदी आढळून आल्या आहे. त्यांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे. ज्यांच्या नोंदी आहेत आणि कायदेशीर अधिकार असताना ज्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या, त्यांना ते मिळण्याचा मार्ग यातून सरकारने मोकळा केला आहे. राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे. कायद्याच्या आणि संविधानाच्या कक्षेतच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीपासूनच सांगत आहेत. तीच भूमिका कायम आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
ओबीसीत कोणीही वाटेकरी नाही
कालच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो का हे तपासून घेऊ. शिवाय यावर आक्षेप सुद्धा मागवले आहे. त्याची सुनावणी होईल आणि त्यानंतर अधिसूचना मान्य होईल. कुणबी असूनही प्रमाणपत्र न मिळणे यात सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. जे मुळात कुणबी समाजात होते, त्या लोकांना लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळेल. ओबीसी समाजाचा नाराज होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ओबीसीत कोणालाही वाटेकरी घेतले गेले नाही. पुढे काय भूमिका येईल ते बघू. आज तरी ओबीसी समाजात अन्याय झाल्याची चिंता करण्याची गरज नाही. सदावर्ते यांच्यासोबत भाजपचा आणि आमचा कुठलाही संबंध नाही. एखाद्या वेळी भूमिका विरुद्ध गेल्यावर भाजपला बदनाम करण्याचे काम होत असते, असे देखील बावनकुळे म्हणाले.
आणखी कोणी येत असेल तर स्वागतच
आज भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे, तसा मोदीजींचा संकल्प आहे. त्या संकल्पाला साथ देण्यासाठी अजित पवार, एकनाथ शिंदे, नितेश कुमार, आणखी कोणी येत असेल तर हे राष्ट्र हितासाठी मोदी यांच्यासोबत येत असतील तर त्यांचा सन्मान झाला पाहिजे. आणखी कोणी यायला इच्छुक असल्यास त्यांचेही अभिनंदन आणि स्वागतच आहे. कारण ते देशासाठी आणि राष्ट्रासाठी महत्वाचे आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या