नागपुरात गंगा जमुना वस्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्या आमने-सामने; आंदोलनावरुन आरोप-प्रत्यारोप
नागपूरच्या मध्यवर्ती भागांत सुमारे दहा एकर परिसरात वारंगणांची गंगा जमुना वस्ती विस्तारलेली आहे. ही वस्ती हटवण्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्या आमने-सामने आल्या आहेत.
नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचं गृह खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलं, तरी उपराजधानी नागपुरात पोलिसांच्या एका कारवाईसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन महिला नेत्या आमने-सामने आल्या आहेत. एका बाजूला ज्वाला धोटे गंगा जमुना वारंगणांची वस्ती खुली करण्यासाठी आंदोलन करत आहेत. तर दुसर्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस आभा पांडे इतर पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह गंगा जमुना वस्ती हटवण्यासाठी आंदोलन करत आहेत. काल (रविवारी) रक्षाबंधनाच्या दिवशी गंगा जमुना या वारंगणाच्या वस्तीसमोर दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर तब्बल दोन तास जबर राडा झाला. दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात आर्थिक लाभापाई आंदोलन उभारण्याचा आरोप करत हा मुद्दा फक्त गंगा जमुना वस्ती पुरता मर्यादित नाहीच, असे संकेतही दिले.
नागपूरच्या मध्यवर्ती भागांत सुमारे दहा एकर परिसरात ही वारंगणांची गंगा जमुना वस्ती विस्तारलेली आहे. उपराजधानी नागपुरात रेड लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वस्तीत सुमारे दोन हजार महिला आणि तरुण मुली देहविक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, 10 ऑगस्ट रोजी पोलिसांनी या वस्तीत छापा घातल्यानंतर आठ अल्पवयीन मुलींकडून बळजबरीनं देहव्यापार करून घेतलं जात असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगा जमुना वस्तीत अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करून घेतले जात असल्याचा ठपका ठेवत वस्ती एका वर्षासाठी सील केली.
गंगा जमुना वस्तीत देह व्यवसायाच्या आड अनेक गुन्हेगार अमली पदार्थांचा व्यवसाय आणि गुन्हेगारी कृत्य करतात, असा ठपकाही पोलिसांनी आपल्या कारवाईच्या समर्थनार्थ ठेवला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या आणि विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गेल्या काही दिवसांपासून गंगा जमुना वस्ती सील करण्याच्या पोलिसांच्या कारवाई विरोधात आंदोलन सुरु केलं आहे. 15 ऑगस्ट रोजी ज्वाला धोटे यांनी वस्तीत जाऊन पोलिसांनी लावलेले सर्व बॅरिकेड्स फेकून दिले होते. अशातच काल (रविवारी) रक्षाबंधनाच्या निमित्तानं ज्वाला धोटे पुन्हा गंगा जमुना वस्तीत पोहोचल्या आणि त्यांनी वारंगणांकडून रक्षासूत्र बांधून घेत, मी तुमची रक्षा करेन, असं आश्वासन दिलं आणि पुन्हा पोलिसांनी लावलेल्या बेरिकेट्सची तोडफोड करत वस्ती खुली करण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या बाजूला गंगा जमुना वस्तीच्या अवतीभवती राहणाऱ्या नागरिकांनीही पोलिसांच्या कारवाईला समर्थन देत आंदोलन सुरु केलं. वेश्याव्यवसाय हटाव कृती समितीच्या बॅनरखाली गंगा जमुनाच्या चारही बाजूला असलेल्या मोखारे वस्ती, देवीकर मोहल्ला, लाडपूरा, हमालपुरा, कुंभारपुरा, इतवारी भाजी मंडी भागातून शेकडो नागरिक गंगा जमुनामध्ये चालणाऱ्या देहविक्रीचा व्यवसाय आणि त्यामुळे चारही बाजूच्या परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा घेऊन आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस आभा पांडे आणि भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी या आंदोलनाचं संयुक्तरित्या नेतृत्व केलं. वारंगणा त्यांच्या घटनात्मक अधिकाराचा मुद्दा पुढे करत असताना परिसरातील नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचं काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आभा पांडे यांनी यावेळी उपस्थित केला.
आंदोलनात आलेल्या परिसरातील सामान्य नागरिकांनी ही गंगा जमुना वस्तीत चालणाऱ्या देहविक्रीच्या व्यवसाय आणि तिथल्या बेकायदेशीर कृत्यांमुळे भयंकर त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा पुढे केला. वारंगणांच्या शोधात अनेक मद्यपी थेट सामान्य नागरिकांच्या घरात शिरतात आणि महिलांशी अभद्र व्यवहार करतात, असा आरोपही महिला आंदोलकांनी यावेळी केला. दरम्यान, भाजप नगरसेवकांनी ज्वाला धोटे यांचं गंगा जमुनामधील वारंगणांशी तसेच परिसरातील नागरिकांशी काहीही देणं घेणं नाही. त्या वारंगणांकडून पैसे घेऊन आंदोलन करत असल्याचा गंभीर आरोपही भाजप नगरसेवक मनोज चापले यांनी केला.
दरम्यान, दोन्ही बाजूचे आंदोलक समोरासमोर आल्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. सुमारे दोन तास गंगा जमुना वस्तीला लागून जाणारा मुख्य रस्ता आंदोपणामुळे बंद होता. दोन्ही गटांना एकमेकांपासून लांब ठेवण्यासाठी पोलिसांना बरीच सौम्य बळाचा वापरही करावा लागला होता. एका बाजूला पोलिसांना विरोध करणाऱ्या वारंगना, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या समर्थनार्थ घोषणा देणारे सामान्य नागरिक आणि दोन्ही गटांचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्या, असं अजब चित्र काल नागपूरात पाहायला मिळालं.