खासदार बाळू धानोरकर यांचा वाराणसीमधून मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्धार
2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना वाराणसी मतदारसंघात टक्कर देणारी व्यक्ती महाराष्ट्रातून?वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा करु असं काँग्रेस खासदार बाळू धानोरकर म्हणाले.
नागपूर : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी आता कंबर कसली आहे. वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा करु असं धानोरकर यांनी सांगितलं. इतकंच नाही तर मोदींविरोधातील लढाई कशी जिंकायची हे मला चांगलंच कळतं असा दावाही त्यांनी केला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी एबीपी माझाने नागपुरात बाळू धानोरकर यांच्याशी संवाद साधला.
'प्रियांका गांधी लढणार असतील ताकदीनिशी वाराणसीमध्ये ठाण मांडून बसेन' "मी संसदेच्या अधिवेशनाला जात आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर वाराणसीमधून लढण्याची माझी इच्छा आहे. प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या प्रभारी आहेत. अधिवेशनादरम्यान प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहे, त्यांना विचारणार, जर त्यांनी म्हटलं की धानोरकर तुम्ही लढा, आमचा पाठिंबा आहे तरच हा प्रश्न उपस्थित होईल. जर प्रियांका गांधी लढणार असतील तर हा बाळू धानोरकर पूर्ण ताकदीनिशी वाराणसीमध्ये ठिय्या मांडून बसेल," असं बाळू धानोरकर यांनी सांगितलं. वाराणसी मतदारसंघ का? धानोरकर म्हणाले... "खासदार देशभरात कुठूनही लढू शकतो. शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार होत आहे. 26 जानेवारीला आंदोलन झालं तरी पंतप्रधान, कृषीमंत्री, गृहमंत्री जागे होत नाहीत, याची खंत आहे. 57 टक्के शेतकऱ्यांच्या भरवशावर हा देश चालत आहे, तरी सरकार जागं होत नसेल तर सरकारला जागं करण्यासाठी मी वाराणसीला जाणार असल्याचं मी बोललो. 'निवडणूक कशी जिंकायची मला चांगलं कळतं' निवडणुका हा नियोजन पद्धतीने लढायच्या असतात. निवडणूक कशी जिंकायची हे मला चांगलं कळतं. पहिल्यांदा निवडणूक हरलो तेव्हा मी चांगला परिपाठ मी शिकलो. तेव्हापासून मी कोणतीही निवडणूक हरलेलो नाही. माझ्या हातात तीन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे काहीच कठीण नाही.दरम्यान याआधीही धानोरकर यांनी मोदींविरोधात लढण्याची इच्छा बोलून दाखवली होती. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढून त्यांचा ट्रम्प करु, असं धानोरकर म्हणाले होते.
राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी मोदी लाट असताना देखील चंद्रपूर लोकसभेत भाजपचा पाडाव केला. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येऊन अवघ्या 15 दिवसात त्यांनी निवडणूक जिंकली.
2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना वाराणसीत टक्कर देणारी व्यक्ती महाराष्ट्रातून?