'पक्षाने आदेश द्यावा, मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही' : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर
पक्षाने आदेश दिला तर पंतप्रधान मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी दिला आहे. आज काँग्रेसनं नागपुरात राजभवनावर आंदोलन केलं. त्यावेळी खासदार धानोरकर बोलत होते.
नागपूर : पक्षाने आदेश दिला तर पंतप्रधान मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी दिला आहे.दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आज काँग्रेसनं नागपुरात राजभवनावर आंदोलन केलं. त्यावेळी खासदार धानोरकर बोलत होते.
यावेळी धानोरकर म्हणाले की, भाजपा ही आमची पैदाईश आहे. 1907 मध्ये यांनी प्रवेश केला आणि 1925 मध्ये जन्म घेतला. ज्या पद्धतीने अमेरिकेतून ट्रम्प हद्दपार झाला, त्यापद्धतीने मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय राहणार नाही. बाळू धानोरकर महाराष्ट्रातला एकमेव खासदार नाही. पक्षाने फक्त आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन लढायची ताकत माझ्यामध्ये आहे. आता तीन वर्ष बाकी आहेत. या तीन वर्षाच्या कालखंडात पक्षानं आदेश द्यावा की धानोरकर जा तुम्ही वाराणसीत. जर मी गेलो नाही, लढलो नाही आणि जर नाही मोदींचा ट्रम्प केला तर नावाचा बाळू धानोरकर सांगणार नाही, असं ते म्हणाले.
कोण आहेत बाळू धानोरकर? - लोकसभेत महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होता होता ज्यांच्यामुळं वाचला ते म्हणजे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर. - सुरेश धानोरकर हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. - चंद्रपूर मतदारसंघात त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला. - शिवसेनेला रामराम ठोकून ऐन निवडणूक काळात काँग्रेसमध्ये आलेल्या सुरेश धानोरकर हे या निकालातून काँग्रेससाठी मोठा आधार ठरले.
विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी चंद्रपुरातून विनायक बांगडे यांना हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. बांगडे यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपूरमधील अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यात एका नाराज कार्यकर्त्याने याबाबत फोन करुन तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारणा केली होती. त्यावर माझं पक्षात कुणी एकत नाही असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत हायकमांडने चंद्रपुरातून धानोरकरांना उमेदवारी दिली होती. या संधीचं सोनं करत धानोरकरांनी महाराष्ट्रात एकमेव काँग्रेस खासदार होण्याचा मान मिळवला.