Mangalprabhat Lodha : 'देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे भीष्मच', मंगलप्रभात लोढा यांची स्तुतीसुमने
Mangalprabhat Lodha : देवेंद्र फडणवीस हे सहनशील आहेत, म्हणूनच तरुण त्यांच्या पाठिशी असल्याचं म्हणत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नागपुरातील रोजगार मेळाव्यात फडणवीसांचे कौतुक केले.
नागपूर : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म आहेत. कारण भीष्मासारखीच सहनशीलता त्यांच्याकडे आहेत, असं म्हणत मंत्री मंगलप्रभात लोढा (MangalPrbhat Lodha) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. अंतरवली सराटीच्या घटनेत फडणवीसांचा हात नव्हता. हे RTI मध्ये देखील स्पष्ट झालं आहे. तरीही फडणवीसांवर आरोपांचा भडीमार होत होता. पण ते शांत राहिले, असं म्हणत मंगलप्रभात लोढा यांनी फडणवीसांच्या सहनशीलतेचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. नागपुरातील महारोजगार मेळाव्यात राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे संवाद साधत होते.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी महायुतीच्या सरकारकडून राज्यात नमो रोजगार मेळावे घेण्यास सुरुवात झालीये. त्याच पार्श्वभूमीवर कौशल्य विकास आणि रोजगार विभागाकडून नागपुरात राज्यातील पहिल्या नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे नागपुरात तब्बल 50 हजार तरुणांना 200 नामांकित कंपन्यांमध्ये तर 600 उद्योग व्यवसायांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याच कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील हजेरी लावली.
मंगलप्रभात लोढा यांनी काय म्हटलं?
अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्जचा जो प्रकार घडला त्याचा उल्लेख मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केला. त्यांनी म्हटलं की, अंतरवाली सराटीमध्ये जी घटना घडली त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा काहीही दोष नव्हता. तरीही त्यांच्यावर आरोप करण्यात आहे. पण ते शांत राहिले. सत्ता गमावलेले नेते फडणवीसांबद्दल सातत्याने चुकीचा प्रचार करत होते. फेसबुकवर त्यांची बदनामी केली जात होती. पण तरीही फडणवीस शांत राहिले. आरोप झाल्यानंतरही फडणवीसांनी विकासाचे काम सुरु ठेवले. ते सहनशील आहेत म्हणून तरुण त्यांच्या पाठिशी आहे. फडणवीस तुम्ही जरी शांत राहिलात तरी तरुणशक्ती शांत बसणार नाही. ती तुमच्या सोबत उभी राहणार आहे, असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं.
दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगारच्या निमित्ताने अनेक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास देखील यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. तसेच या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.
नमो महारोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य
प्रशासन तरुणांकडून ऑनलाइन अर्ज घेणार
प्रशासन मोठ्या कंपन्यांना निमंत्रित करणार
प्रत्येक तरुणाला चार कंपन्यांसाठी अर्ज करता येणार
नमो महारोजगार मेळाव्याच्या दिवशी तरुणांच्या शैक्षणिक प्रमाणपत्र तपासले जाईल..
लगेच पात्र तरुणांचे इंटरव्ह्यू घेतले जाणार..
प्रत्येक तरुणाला कमाल चार इंटरव्ह्यू देता येईल..
तरुणाने आवश्यक कौशल्य दाखवल्यास लगेच ऑफर लेटर दिले जाणार
नागपूरात दोन दिवस चालणाऱ्या पहिल्या नमो महारोजगार मेळाव्यात ५० हजार अर्जदार तरुण आणि २०० कंपन्या उपस्थित आहे..