ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार, तिथेच स्वतः विरोधात विनयभंगाचा गुन्हा; महिला होमगार्डसोबत छेडछाड पोलीस निरीक्षकाला महागात
महिला होमगार्डसोबत छेडछाड करणं नागपुरातील पोलीस निरीक्षकाला महागात पडलं आहे. ज्या पोलिस स्टेशनमध्ये ते ठाणेदार होते तिथेच स्वतः विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्याची आणि निलंबित होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
नागपूर : स्वतःच्या पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून तैनात असलेल्या 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करत तिच्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांना शुक्रवारी (25 जून) रात्री पोलीस आयुक्तांनी निलंबित केलं. तसंच ज्या यशोधरानगर पोलीस स्टेशनचे मेश्राम ठाणेदार होते त्याच पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदार महिला होमगार्ड तरुणीला अशोक मेश्राम यांनी "तुला पीएसआय बनण्यास मदत करतो" असं सांगून तिच्याशी सलगी वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरुणी प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यानंतर बुधवारी (23 जून) संध्याकाळी अशोक मेश्राम यांनी तिला स्वतःच्या केबिनमध्ये बोलावलं. आपल्या वर्दीतली एक फीत नीट करण्याच्या नावाखाली त्यांनी तिच्याशी अश्लील वर्तन केलं. संबंधित तरुणी केबिनच्या बाहेर जाऊन रडू लागल्याने हे प्रकरण उघडकीस आलं होतं.
त्यानंतर या प्रकरणाची कुणकुण पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशाखा समितीच्या अध्यक्ष डीसीपी विनिता शाहू यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. विशाखा समितीच्या चौकशीत अशोक मेश्राम यांच्याविरोधात होमगार्ड तरुणीसह इतर महिला कर्मचाऱ्यांनीही वाईट वागणुकीची तक्रार केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांना निलंबित करण्याचे आणि त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.