Maharashtra Assembly Elections 2024 : मविआ अन् तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला,पण...; भाजपने कामठीतून तिकीट कापल्यानंतर टेकचंद सावरकरांचं मोठं वक्तव्य
Tekchand Savarkar : भाजपने कामठी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली आहे.
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून 99 उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपकडून कामठी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार टेकचंद सावरकर (Tekchand Savarkar) यांचे तिकीट कापून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर आता आमदार टेकचंद सावरकर नाराज आहेत.
टेकचंद सावरकर हे कामठी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र, यंदा भाजपच्या पहिल्या यादीत कामठी मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने सलग तीन टर्म आमदार असलेल्या बावनकुळेंचे तिकीट कापून टेकचंद सावरकरांना संधी दिली होती. आता भाजपने कामठीमधून सावरकर यांचे तिकीट कापून पुन्हा एकदा बावनकुळेंना संधी दिली
काय म्हणाले टेकचंद सावरकर?
तिकीट कापले गेल्यानंतर आमदार टेकचंद सावरकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या व तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी माझ्याशी संपर्क साधला. मात्र, मी भारतीय जनता पक्षाची एकनिष्ठ आहे. मी निवडून येण्याच्या लायकीचा उमेदवार नसेल असे पक्षाला वाटत असेल. त्यामुळे पक्षाने माझे तिकीट कापले. मी पक्षाच्या निर्णयावर समाधानी नसलो तरी पक्षाच्या निर्णयाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे टेकचंद सावरकर यांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य भोवलं?
दरम्यान, टेकचंद सावरकर यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल केलेले वक्तव्य भोवल्याची चर्चा आता रंगली आहे. टेकचंद सावरकर म्हणाले होते की, आम्ही इतकी मोठी भानगड कशासाठी केली? हे तुम्ही इमानदारीने सांगा. ज्या दिवशी तुमच्या घरासमोर मतदानाची पेटी येईल. त्यावेळी माझ्या लाडक्या बहिणी भाजपला मतदान करतील, यासाठी आम्ही हा जुगाड केलाय. हे सर्वजण खोटे बोलले असतील. मात्र, मी खरे बोलतो. माझे बोलणे खरे आहे की नाही? नाहीतर बोलायचे एक आणि करायचे एक, असे करायला मी रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे का? असे टेकचंद सावरकर यांनी म्हटले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण