Anna Bhau Sathe Jayanti : वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदानः राधाकृष्णन बी.
देशाला महाराष्ट्राने अनेक थोरपुरुष दिले आहेत. त्यांच्या विचारसरणीचा अवलंब करा व विकास साधा. ही खरी त्यांना आदरांजी आहे, असे विभागी आयुक्तांनी सांगितले.
नागपूर : वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे. तळागाळातील व्यक्तींना शिक्षण देवून त्यासाठी लागणाऱ्या सर्वसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले. समाजिक न्याय विभाग व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, दीक्षाभूमी येथे लोकशाहीरअण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त सुरेंद्र पवार, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप बोरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. किशोर भोयर, सामाजिक कार्यकर्ते माया घोरपडे, हंसराज मेश्राम, बुधाजी सूरकार, कृष्णा इंगळे, चंद्रकांत वानखेडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे मिश्रीकोटकर, दिव्यांग प्रतिनिधी राज कापसेकर, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक रुपेश नागरिकर आदी यावेळी उपस्थित होते.
दुष्टीकोन चांगला असला तर प्रगती शक्य
दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लाडपागे समितीनुसार सफाई कामगारांना महानगरपालिका अंतर्गत नियुक्ती देण्यात आली. त्यानूसार सफाई कामगारांनी आपल्या पाल्यास चतुर्थश्रेणीत समावून घेण्याचे सांगितले होते. परंतु या घटकांतील उमेदवारांनी तृतीय व त्यावरील श्रेणीत घेण्यात यावे, असे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे या घटकांतील व्यक्ती उच्च पदावर आरुढ होतील हीच आकांक्षा होती, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले. एखाद्या बाबीकडे बघण्याचा दुष्टीकोन चांगला असला तर विकासाला चालना मिळते. देशाला महाराष्ट्राने अनेक थोरपुरुष दिले आहेत. त्यांच्या विचारसरणीचा अवलंब करा व विकास साधा. ही खरी त्यांना आदरांजी आहे, असेही त्यांनी सांगितले. समाजात वावरतांना प्रेरित व समकक्ष समतेची भावना ठेवली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुत्वाला सर्वोच्च महत्व दिले आहे, बंधुत्वाची भावना समाजात नसेल तर विकास होणार नाही, अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले.
धर्मनिरपेक्षता टीकविणे प्रत्येकाचे कर्तव्य
जिल्हाधिकारी यापदावर मी आज आहे, यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असून बंधुत्वाची भावना यास कारणीभूत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबांच्या पावलांवर पाऊल ठेवून सामाजिक समरसता निर्माण केली. त्यासाठी लोकजागृती केली. समातावादाचा मंत्र त्यांनी दिला, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी दुर्बल व वंचित घटकांसाठी केलेले कार्य अमुल्य आहे. त्यांच्या विचाराचा वारसा कायम ठेवून त्यांचे पालन सर्वांनी केले तर देशाचा विकास शक्य आहे. लोकशाहीरांनी गीत, शाहीरीच्या माध्यमातून उचनिच,जातीभेद, रंगभेद, लिंगभेद नष्ट करण्याचे कार्य केले. अनेक साहित्याची निर्मिती केली. प्रेमाची शिकवण त्यांनी दिली. धर्मनिरपेक्षसमाज निर्मिती कार्य त्यांच्या पासून सुरु झाले. ते टिकविणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. सक्षम समाज निर्मितीसाठी ते आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.