(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : लाच दिली नाही म्हणून फेरीवाल्यांचे ठेले जमिनीत गाडले, नागपूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे लज्जास्पद कृत्य
Nagpur G 20: नागपुरात सिविल ट्वेंटी ही परिषद सुरू असून परदेशी अधिकाऱ्यांसमोर फेरीवाल्यांचं वास्तव दिसू नये म्हणून नागपूर महापालिकेने रस्त्यावरून फेरीवाल्यांना हटवण्याचं काम सुरू केलं आहे.
नागपूर: G-20 परिषदेच्या अंतर्गत सध्या नागपुरात सिविल ट्वेंटी ही परिषद सुरू असताना नागपूर महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी अत्यंत लज्जास्पद कृत्य केल्याचं समोर आलं आहे. नागपुरातील रस्ते फेरीवालेमुक्त दिसावे म्हणून काही फेरीवाल्यांचे ठेले उचलून त्यातील साहित्यासह जमिनीत पुरले. तर लाच दिली नाही म्हणून अधिकाऱ्यांनी हे कृत्य केल्याचा फेरीवाल्यांनी आरोप केला आहे.
G 20 परिषदेच्या अंतर्गत सध्या नागपुरात सिविल ट्वेंटी ही परिषद सुरू असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे सुशोभीकरण करण्यात आलं आहे. परदेशी पाहुण्यांना नागपूरच्या रस्त्यांवर अस्वच्छता आणि फेरीवाल्यांची गर्दी दिसू नये म्हणून अनेक रस्त्यांवरून फेरीवाल्यांनाही रस्त्यांवरून हटवण्यात आले आहे. याच प्रक्रियेत नागपूर महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी अत्यंत लज्जास्पद कृत्य केले आहे.
नागपुरात ठिकठिकाणी दिसणारे मोठे नाले G-20 च्या होर्डिंग्जने झाकण्यात आले आहेत, जुनाट पडकी घरंही झाकण्यात आली आहेत. निर्माणाधीन इमारती झाकल्या आहेत, अवघ्या 48 तासांसाठी नागपुरात आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या नजरेस नागपुरातील हे वास्तव पडू नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ही झाकाझाकी केली आहे. मात्र महापालिकेचे अधिकारी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी नागपूरचे रस्ते फेरीवालामुक्त करण्यासाठी अन्यायाची परिसीमा गाठली आहे. नागपूरच्या हजारी पहाड परिसरात ठेले मातीत गाडले गेले. मातीत अर्धवट गाडला गेलेला मोडकळीस आलेला एका फेरीवाल्याचा ठेला आणि याच जमिनीत खोलवर गाडले गेलेले चहा विकणाऱ्या गरीब बाईचे भांडे आणि गॅस सिलेंडर असं चित्र दिसतंय.
G 20 साठी नागपुरात आलेल्या परदेशी पाहुण्यांना भारतातील महानगरांमधील फेरीवाल्यांचं कटू वास्तव दिसू नये यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गेले काही दिवस फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली. याच मोहिमेत महापालिकेच्या धरमपेठ झोन अंतर्गत अतिक्रमण विरोधी पथकाने फेरीवाल्यांचे ठेले उचलले. मात्र ते नियमानुसार झोन कार्यालयात जमा न करता परस्पर हजारी पहाड परिसरातील एका जुन्या खाणीच्या खड्ड्यात आणून पुरले. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गरीब फेरीवाल्यांचं साहित्य, भांडी आणि नाहीतर गॅस सिलेंडर ही जमिनीत पुरल्याचं दिसून आलं.
दरम्यान, एक फेरीवाला आणि अतिक्रमण विरोधी पथकाच्या वाहन चालकाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून त्यामध्ये तो चालक ठेला सोडवण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.
जप्त करण्यात आलेले ठेले आणि त्यावरील साहित्य सोडवण्यासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला जातोय. गरीब फेरीवाले त्याची व्यवस्था करू शकले नाही, म्हणून त्यांचा ठेला आणि साहित्य जमिनीत गाडून टाकण्यात आला असल्याचाही आरोप करण्यात येतोय.