Chandrashekhar Bawankule : नागपूरमध्ये पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'एबीपी माझा'च्या बातमीची महसूल मंत्र्यांकडून गंभीर दखल; म्हणाले...
Nagpur News : नागपूर जिल्ह्यात महसूल प्रशासन वेळेत जात प्रमाणपत्र देत नाही, त्यामुळे अनेक गरीब पारधी विद्यार्थिनींवर शिक्षण अर्धवट सोडण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
Nagpur News : पारधी समाजातील विद्यार्थ्यांना अनेक खेटे घालूनही जात प्रमाणपत्र (Caste certificate) दिले जात नाही. नागपूरातील काही पारधी तरुणींवर दोन दोन वर्षे जात प्रमाणपत्र न मिळत असल्यामुळे कशा पद्धतीने शिक्षण (Education) अर्धवट सोडून लग्न करण्याची वेळ आली आहे, असे भीषण वास्तव एबीपी माझाने समोर आणले होते. आता या प्रकरणाची राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी गंभीर दखल घेतली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जात प्रमाणपत्रासाठी (Caste Certificate) अर्ज करून दोन वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही महसूल अधिकारी जात प्रमाणपत्र देत नाही म्हणून पारधी समाजाच्या विद्यार्थिनींवर दुर्दैवी स्थिती ओढवली आहे. महसूल प्रशासनाकडूनजात प्रमाणपत्रासाठी 1950 पूर्वीचा पुरावा बंधनकारक आहे. मात्र, पारधी समाजातील यापूर्वीच्या पिढ्या जंगल खोऱ्यात भटकं जीवन जगत असल्यामुळे अनेक पारधी विद्यार्थ्यांकडे त्यांच्या आधीच्या पिढीचे जातीचे दाखले व इतर पुरावे नाहीत. त्यामुळे अनेक होतकरू पारधी विद्यार्थ्यांनी आदिवासी म्हणून जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. या अर्जांना दोन वर्ष उलटले आहेत. मात्र त्यांना नागपूर जिल्ह्यात प्रशासनाने जात प्रमाणपत्र अद्याप दिलेले नाही. पारधी समाजाची 1950 पूर्वीच्या पुराव्याची अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने याआधीच महसूल अधिकाऱ्यांना पारधी बेड्यांवर जाऊन गृहभेटी आणि मोक्काचौकशी करून 1950 पूर्वीचे पुरावे नसलेल्या पारधी जातीतील अर्जदारांना जात प्रमाणपत्र द्यावे, असे नियम तयार केले आहे.
'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
मात्र महसूल प्रशासनाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शेकडो पारधी विद्यार्थी जात प्रमाणपत्र विना ताटकळत आहेत. अर्ज करूनही आपल्याला जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे पारधी विद्यार्थ्यांमध्ये खास करून विद्यार्थिनींमध्ये निराशेचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर अनेक पालकांनी त्यांच्या मुलींचे शिक्षण थांबवण्याचे आणि समाजाच्या दबावापोटी अल्पवयातच त्यांचे लग्न लावण्याचे दुर्दैवी निर्णय घेतल्याचे दिसून आले आहे. ही बातमी एबीपी माझाने प्रसारित केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. "आजच आम्ही या संदर्भातील बैठक घेऊ आणि पारधी समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यामध्ये यांनी दिरंगाई केली असेल, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा