NMC : आता आपल्या तक्रारी नोंदवा मनपाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर; खरंच समस्या सोडवणार की पांढरा हत्ती ठरणार?
नागरिकांनी मनपाच्या सोशल मीडियावर नोंदविलेल्या तक्रारी अनेक महिन्यांपासून प्रलंबित असतानाच मनपाने आता व्हॉट्सॲप क्रमांक जारी करुन आपण तत्काळ तक्रारी सोडविणार असल्याचा दावा केला आहे.
Nagpur News : नागरिकांच्या नागपूर महानगरपालिका (NMC) संबंधित समस्या सोडवण्यासाठी मनपाच्यावतीने व्हॉट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. यापूर्वी सोशल मीडियावर आपण तक्रारी सोडवणार असल्याचा मोठा गाजावाजा मनपाच्यावतीने करण्यात आला होता. मात्र त्यावर फक्त 'निवडक'च तक्रारी सोडवण्यात येत असून बऱ्याच तक्रारी अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याची तक्रार अनेकांची आहे.
शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची (Nagpur Municipal Corporation) यंत्रणा सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. नागरी समस्यांबाबत तक्रारी नोंदवण्यात अधिक सुलभता प्रदान करत मनपाद्वारे आता व्हॉट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. याआधी लाईव्ह सिटी ॲपवर तक्रारी मागवण्यात येत होत्या. आता या ॲपच्या जोडीला मनपाने 8600004746 हे व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा प्रदान करतानाच त्यांच्या समस्या वेळीच सोडवल्या जाव्यात यासाठी मनपा कार्यरत असून तक्रार निवारण यंत्रणेला सहकार्य करत नागरिकांनी आपल्या तक्रारी लाईव्ह सिटी ॲप किंवा व्हॉट्सॲप क्रमांकावर नोंदवाव्यात, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरी तक्रारींच्या संदर्भात नुकतीच अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारी प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी व्हॉट्सॲप क्रमांक सुरु करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी नागपूर लाईव्ह सिटी ॲप आणि सोशल मीडियावर येणाऱ्या तक्रारीच्या सुद्धा आढावा घेतला. बैठकीत उपायुक्त निर्भय जैन, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक महेश धामेचा आणि सर्व सहाय्यक आयुक्त तसेच कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
नागपूर शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मुलभूत गरजांसंदर्भात मनपाकडे तक्रारी दाखल केल्या जात आहेत. मनपाद्वारे लाईव्ह सिटी ॲप कार्यान्वित करुन त्यावर नागरिकांनी तक्रार नोंदवण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे. नागरिकांकडूनही ॲपला उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रशासनाद्वारे वेळीच तक्रारींचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांना तक्रार नोंदवण्यात अधिक सुलभता मिळावी यासाठी मनपाद्वारे 8600004746 हा विशेष व्हॉट्सॲप क्रमांक जारी करण्यात आले आहे.
अशी नोंदवा तक्रार
या क्रमांकावर नागरिकांनी त्यांच्या परिसरात असलेल्या समस्येचे फोटो काढून त्यासोबत संपूर्ण पत्ता आणि माहिती तक्रारकर्त्याच्या नावासह पाठवावा. व्हॉट्सॲप आणि लाईव्ह सिटी ॲपवर येणाऱ्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर कार्यवाही करण्यासाठी मनपाद्वारे तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेत कार्यरत कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्तांनी प्रत्येक तक्रारीला प्राधान्याने वेळ देऊन ती संबंधित विभागाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले. प्रलंबित तक्रारींच्या कार्यवाहीचा पाठपुरावा करणे, तक्रारदारांना समाधानकारक प्रतिसाद देण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले. सोबतच स्वच्छता ॲपवर घनकचरा व्यवस्थापन संदर्भातील तक्रारी नोंदवाव्या जेणेकरुन या स्वरुपाच्या तक्रारी 12 तासात निकाली काढण्यात येईल, असा दावा मनपाने केला आहे. स्वच्छता संदर्भात मनपाच्या विविध उपक्रमांना नागरिकांची उत्तम साथ मिळत आहे. पूर्वी ज्या ठिकाणी लोक कचरा टाकत होते, तिथे आता स्वच्छता दिसून येत आहे. नागरिक घरातील कचरा कचरा कुंडीमध्ये टाकत आहेत. उपराजधानीला स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी तसेच महामेट्रो, राष्ट्रीय महामार्ग, बांधकाम विभाग, सीपीडब्ल्यूडी, नागपूर स्मार्ट सिटी यासोबतच शहरातील विविध स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत.
ही बातमी देखील वाचा