(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidarbha Weather Update : सलग चौथ्या दिवशी विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी; 'या' जिल्ह्यांना आजही ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने सलग चौथ्या दिवशी हजेरी लावली आहे. तर आज पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Vidarbha Weather Update: हवामान विभागानं (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यासह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) सलग चौथ्या दिवशी दमदार हजेरी लावली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून विदर्भात उष्णतेची लाट आल्याचे चित्र असतानाच आता अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार एन्ट्री केल्याने तापमानात अचानक मोठी घट झाली आहे. तर ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने एंट्री केल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच आजही विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह, 30-60 प्रति तास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सलग चौथ्या दिवशी विदर्भात पावसाची हजेरी
राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. आजही अनेक भागात पावसाची शक्यता (Maharashtra Rain) नागपूर हवामान विभागाने वर्तवली होती, त्याप्रमाणे आज पहाटेपासून नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली होती. त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, अलिकडे झालेल्या अवकाळी पावसामुळं वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकडया पासून सुटका झाली आहे. तर दुसरीकडे या अवकळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना झाल्याचेही चित्र आहे.
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बाळापुर आणि लगतच्या तालूक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. तर पातुर तालुक्यातल्या मळसुर भागात गारपीटीसह जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. या गारपीट आणि अवकाळीमुळे आंबा, निंबू, टरबूज आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकळीने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी या पिकांच्या नुकसानाची तात्काळ पाहणी आणि पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
किमान तापमानात मोठी घट
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आज विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये गारपीट, विजांचा कडकडाटासह, 30-60 प्रति तास सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आज उर्वरित विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या, 13 एप्रिलला विदर्भला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भातील तापमानात देखील मोठे बदल झाले असून आज गोंदियातील कमाल तापमानाचा पारा 11. 5 अंशाने घसरून 28. 8 अंशांवर पोहचला आहे. तर नागपूर 14. 6 अंशाने घसरून 25. 8 अंशावर आले आहे. तर तिकडे वर्धा जिल्ह्याच्या पारा 12. 1 अंशाने घसरून 29. 01 अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा अनुभवायला मिळत आहे. तसेच हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या