Winter Session 2023: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचा आज पहिला दिवस; आजही मराठा आरक्षणावर चर्चा
Winter Session 2023: अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर आज म्हणजेच, सोमवारी उत्तर देणार असल्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नावरील चर्चा पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra Assembly Winter Session 2023: नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या (Nagpur Hiwali Adhiveshan) शेवटच्या आठवड्यातील आज पहिला दिवस आहे. अवकाळी पावसावरती (Unseasonal Rain) दोन्ही बाजूकडून चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री याला उत्तर देणार आहेत. प्रश्नोउत्तरांचा तास झाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री अवकाळी पावसावरती उत्तर देतील. आतापर्यंत केलेल्या मदतीची आकडेवारी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) सांगतील मात्र नव्या मदतीचा आकडा आजच जाहीर करणार का? हा प्रश्न आहेच. कारण अद्याप संपूर्ण पंचनामे हाती आलेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजासाठी पॅकेज जाहीर करतात का? त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर आज म्हणजेच, सोमवारी उत्तर देणार असल्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नावरील चर्चा पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणावर सभागृहात मंगळवारी चर्चा होऊ शकते. त्यामुळे आज मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेसाठी सभागृहात येण्याची शक्यता कमीच आहे. तसेच, महागाईच्या प्रश्नावरही आज विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातील, त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेवरतीही चर्चा होण्याची शक्यता आहे.
आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून अंतिम सुनावणी
18, 19 आणि 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडून पूर्ण केली जाईल. शिवसेना दोन्ही गटाची उलट तपासणी झाल्यानंतर आणि लेखी युक्त पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. अध्यक्षांसमोरील या प्रकरणातील सुनावणीचा हा शेवटचा टप्पा असेल यानंतर 10 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना या सगळ्या प्रकरणाचा निकाल देणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपेक्षित आहे.
विधान परिषद महत्त्वाचं कामकाज
राज्य सरकारच्या वतीनं आज मराठा आरक्षण प्रश्नी आपलं म्हणणं मांडलं जाणार आहे. तत्पूर्वी एकिकडे मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरपूर्वी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र, कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असं म्हटलं आहे.
अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याबाबत सरकारच्या वतीनं विशेष पॅकेज जाहीर करण्यात येईल, असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी यावर सभागृहात निवेदन देखील करणार होते, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, पंचनामे पूर्ण न झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी निवेदन करणं टाळलं होतं. आज मुख्यमंत्री अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.
भविष्यात तरुणाईला नोकरी उपलब्ध करून द्यायची असेल तर विद्यार्थांना AI tecnology बाबत माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं या तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रमात सहभाग व्हावा यासाठी आमदार श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी मांडली आहे.
संपुर्ण महाराष्ट्रात सुमारे 10 हजार गिरीभ्रमण आणि गिर्यारोहण यांचे आयोजक आणि संस्था असणे मात्र यांच्याकडून कोणत्याही प्रकारे सूरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही, याकडे आमदार विलास पोतनीस लक्षवेधीच्या माध्यमातुन लक्ष वेधतील.