Nagpur News : कोणी 10, कोणी 12 वर्षांनी घेणार स्वातंत्र्याचा आनंद; विदर्भातील विविध कारागृहात बंदिस्त 65 कैद्यांची आज मुक्तता होणार!
नागपूर : 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विदर्भातील विविध कारागृहात बंदिस्त असलेल्या 65 गुन्हेगारांना आज (15 ऑगस्ट) कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.
Independence Day 2023 : 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विदर्भातील (Vidarbha) विविध कारागृहात बंदिस्त असलेल्या 65 गुन्हेगारांना आज (15 ऑगस्ट) कारागृहातून (Jail) मुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या 65 बंदिवानांना रोज खरीखुरी स्वातंत्र्याची पहाट पाहायला मिळणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सरकारने 2022 मध्ये एक योजना सुरु केली होती. त्यानुसार, 15 ऑगस्ट 2023 रोजी राज्यातील एकूण 186 तर, विदर्भातील 65 कैद्यांना पुढील शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त केलं जाणार आहे.
याआधी यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील 189 कैद्यांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर आता स्वातंत्र्यदिनाला विदर्भातील 65 कैद्यांसह राज्यातील 186 कैद्यांना मुक्त केलं जाणार आहे. त्यामुळे कोणी 10 तर कोणी 12 वर्षांनी स्वातंत्र्याचा आनंद उपभोगणार आहेत.
कारागृहात बंदिस्त असलेल्या अनेकांची वृत्ती किंवा पार्श्वभूमी ही गुन्हेगारांची नसते. त्यांची तशी मानसिकताही नसते. परंतु क्षणिक रागातून निर्माण झालेल्या वादानंतर आक्रित घडून गुन्हा घडतो. त्यांना पोलीस अटक करतात, शिक्षा होऊन त्यांना कारागृहात डांबलं जातं. त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांच्या निर्दोष कुटुंबियांनाही सहन करावी लागली. गुन्हेगारी वृत्ती नसल्यामुळे कारागृहातील अट्टल गुन्हेगारांसोबत राहूनही ते मात्र गुन्हेगार नाही बनले. अशा अनेक कैद्यांना चांगल्या वर्तवणुकीच्या निकषाच्या आधारे मुक्त करण्याचा निर्णय घेतला जातो.
कारागृह आणि मुक्त होणारे कैदी
- नागपूर मध्यवर्ती कारागृह : 23
- अमरावती मध्यवर्ती कारागृह : 19
- अमरावती खुले कारागृह : 05
- अकोला जिल्हा कारागृह : 06
- मोर्शी खुले कारागृह : 01
- वर्धा खुले कारागृह : 02
- वर्धा जिल्हा कारागृह : 01
- वाशिम कारागृह : 01
- भंडारा : 01
- चंद्रपूर जिल्हा कारागृह : 02
- गडचिरोली कारागृह : 04
- मुक्त होणारे एकूण कैदी : 65
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तुरुंगातील चांगली वर्तणूक असलेल्या, तसंच काही निकषांमध्ये येणाऱ्या कैद्यांच्या शिक्षेत विशेष माफी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. काय आहेत हे निकष जाणून घेऊया
- शिक्षेच्या कालावधीपैकी 50 टक्क्यांहून अधिक कालावधी पूर्ण केलेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिला कैदी
- शिक्षेच्या कालावधीपैकी 50 टक्क्यांहून अधिक कालावधी पूर्ण केलेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे तृतीयपंथी कैदी
- 50 टक्क्यांपेक्षा शिक्षेचा कालावधी पूर्ण केलेले 60 वर्षांवरील पुरुष कैदी
- 70 टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेले आणि शिक्षेचा निम्मा कालावधी पूर्ण केलेले कैदी
- गंभीर आजाराने ग्रस्त
- शिक्षेचा ६६ टक्यांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण केलेले कैदी यांचा समावेश विशेष माफीसाठी करण्यात यावा
- शिक्षा पूर्ण केली आहे, मात्र दंडाची रक्कम भरता येत नसल्याने तुरुंगात आहेत
- तसेच 18 ते 21 वयोगटातील कैदी जे अपघाताने गुन्ह्यात अडकले असून, त्यांनी पुन्हा गुन्हा केला नाही