(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंत्रालयात पुन्हा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
शेतकरी आत्महत्या, कुपोषण, शिक्षण, आरोग्य यातील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी हा तरुण आला होता असं बोललं जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत त्याची भेट न झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्या हातात एक बॅनरही मिळालं आहे.
मुंबई : मंत्रालयात पुन्हा एकदा एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. तरुणाने सहाव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र मंत्रालयाच्या इमारतीला असलेल्या संरक्षक जाळीत अडकल्यानं या तरुणाचा जीव वाचला.
लक्ष्मण चव्हाण असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. लक्ष्मण प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकर्ता आहे. अग्निशमन जवानांच्या मदतीनं सुखरुप खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं आहे.
लक्ष्मण शेतकरी आत्महत्या, कुपोषण, शिक्षण, आरोग्य यातील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आला होता असं बोललं जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत त्याची भेट न झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्या हातात एक बॅनरही मिळालं आहे.
दरम्यान, या तरुणाचा आत्महत्येच्या प्रयत्नामागे नेमका उद्देश काय होता याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
याआधी फेब्रुवारी 2018 मध्ये मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन एका तरुणाने आत्महत्या केली होती. तसंच धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या केली होती. त्यानंतर प्रशासनाने मंत्रालयात संरक्षण जाळी बसवली होती.