उल्हासनगरमध्ये इंजेक्शनच्या बाटलीत आढळली अळी
इंजेक्शनच्या बाटलीत चक्क अळी तरंगताना त्यांना आढळून आली. त्यामुळे त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता तुमचा पेशंट घेऊन जा, असं उत्तर देण्यात आल्याचा आरोप महिलेच्या पतीनं केला आहे.
कल्याण : इंजेक्शनच्या बाटलीत अळी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 3 परिसरात रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ समोर आला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागात प्लॅटिनम हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये एका महिलेच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेसाठी एक महिला दाखल झाली होती. या महिलेला लागणारं इंजेक्शन डॉक्टरांनी लिहून दिल्यानंतर महिलेच्या पतीनं हॉस्पिटलच्याच प्लॅटिनम मेडिकलमधून हे इंजेक्शन विकत घेतलं.
मात्र या इंजेक्शनच्या बाटलीत चक्क अळी तरंगताना त्यांना आढळून आली. त्यामुळे त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता तुमचा पेशंट घेऊन जा, असं उत्तर देण्यात आल्याचा आरोप महिलेच्या पतीनं केला आहे.
तर मेडिकल विक्रेत्याला विचारलं असता त्यानेही हात वर करत कंपनीवर जबाबदारी ढकलली. मात्र या सगळ्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं उघड झालं असून औषध कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.