भिवंडीत यंत्रमाग कामगाराचा शॉक लागून मृत्यू
भिवंडीमध्ये यंत्रमाग कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यावेळी इतर कामगारांनी जुन्या मुंबई-नाशिक मार्गावर चाविन्द्रा येथे रस्ता रोको केला.
भिवंडी : भिवंडीमध्ये यंत्रमाग कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शंकर यादव असं 30 वर्षीय कामगाराचं नाव आहे. मृत्यूनंतर मृत कामगाराच्या कुटुंबियांनी मदतीची मागणी केली आहे. परिसरातील संतप्त कामगारांनी रस्ता रोखून धरल्यानं काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
भिवंडी तालुक्यातील सावंदे गावात यंत्रमाग कारखान्यात शंकर लूमकामगार म्हणून काम करत होता. आज सकाळच्या सुमारास शंकर लूम मशिनवर काम करत असताना अचानक मशीनमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोरदार विजेचा झटका बसल्याने तो जमिनीवर कोसळला.
शंकर सोबतच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
दरम्यान, कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची बातमी परिसरात वाऱ्या सारखी पसरली. त्यानंतर परिसरातील कारखान्यात काम करणाऱ्या शेकडो कामगारांनी संताप व्यक्त करत काम बंद पाडलं. या सर्वांनी जुन्या मुंबई-नाशिक मार्गावर चाविन्द्रा येथे रस्ता रोको केला.
अचानक केलेल्या रास्ता रोकोमुळे मुंबई-नाशिक मार्गावर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, घटनेची माहिती पोलिसांना उशिरा मिळाल्याने स्थानिक पोलीस एक तासानंतर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांची समजून काढत मृत कामगाराच्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, अचानक झालेल्या रस्ता रोकोमुळे मुंबई-नाशिक मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान 4 ते 5 तास लागणार असल्याची शक्यता वाहतूक पोलिसांनी वर्तवली आहे.