राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता असताना औरंगाबादचं नामांतर का रखडलं?
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत 1988 बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची घोषणा केली. त्यानंतर जून 1995 ला महापालिकेनं ठराव घेतला.
मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची चर्चा महाराष्ट्रात गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे. दरवेळी औरंगाबाद महापालिका निवडणुकांपूर्वी हा मुद्दा चर्चेला येतो. खरंतर गेल्यावेळी भाजप- शिवसेनेचं सरकार राज्यात होतं तरीही या दोन शहराचं नामांतर होऊ शकलं नाही. औरंगाबाद महापालिका निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर हा सामना सुरु झाला आहे. औरंगाबादचं नामांतर व्हावं यासाठी शिवसेना आग्रही आहे तर भाजपनंही शिवसेनेच्या सुरात सूर मिळवलाय. पण राज्यात गेल्यावेळी भाजपचं सरकार असताना नामांतर का केलं नाही असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
पण भाजपनं याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा औरंगाबाद महापालिकेकडे म्हणजेचं शिवसेनेच्या कोर्टात चेंडू टोलवलाय. 'गेल्या सरकारच्या काळात म्हणजेच फडणवीस सरकारच्या दरम्यान नामांतराचा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेनं पाठवला नाही.त्यामुळे नामांतर झालं नाही' असं भाजपचे आमदार राम कदम यांनी सांगितलंय. आणि निवडणूक डोळ्यासमोर राजकारण केलं जात असल्याची टीका केलीय.
काय आहे नामांतराचा प्रश्न?
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत 1988 बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची घोषणा केली. त्यानंतर जून 1995 ला महापालिकेनं ठराव घेतला. युतीच्या तत्कालीन मंत्रिमंडळानं अधिसूचना काढली. पण प्रकरण न्यायालयात गेलं. नंतर निकाली निघालं. दरम्यानच्या काळात युतीची राज्यातून सत्ता गेली. त्यामुळे तेव्हा नामांतर बारगळलं. अनिता घोडेले शिवसेनेच्या महापौर असताना 4 जानेवारी 2011 मध्ये महापालिकेनं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. मध्यंतरी दिल्लीत औरंगजेब मार्गाचे नामांतर एपीजे अब्दुल कलाम करण्यात आलं. त्यावेळी पुन्हा नामांतराचा मुद्दा निघाला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही यूपीतील काही शहरांची नावे बदलल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा झाली पण पुढे काहीही झालं नाही. खरंतर राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार असताना नामांतर करणं शक्य होतं. पण भाजप आणि शिवसेनेच्या श्रेयवाद आणि टोलवाटोलवीच्या राजकारणामुळे औरंगाबादचं नामांतर काही झालं नाही. आता कुठल्याही क्षणी पालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नामांतरचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आता राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्ता आहे. त्यामुळे हा प्रश्न कायमचा मार्गी लागतो की महापालिका निवडणुकीनंतर बासनात जातो हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या
- 'चिंतातुर जंतूप्रमाणे भाजपनं उगाच वळवळ करू नये', औरंगाबादच्या मुद्यावरुन शिवसेनेचं टीकास्त्र
- औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध: बाळासाहेब थोरात
- औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या ठाकरे सरकारकडून हालचाली
- औरंगाबाद शहराचं नाव आणि इतिहास; 'संभाजीनगर'ची मागणी कुठून आली?
- औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर होणार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा दावा