Devendra Fadnavis-Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
Mumbai Mayor BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदावरून ठाकरे-भाजपात बोलणी सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Mumbai Mayor BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदावरून ठाकरे-भाजपात बोलणी सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबईत महापौरपदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. (Uddhav Thackeray-Devendra Fadnavis)
महापौरपदाच्या निवडणुकीवेळी ठाकरेंचे 65 नगरसेवक गैरहजर राहणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक गैरहजर राहिल्यास निवडणूक बिनविरोध होईल. त्यामुळे मुंबई महापालिकेत 2017 सालाची भरपाई ठाकरे भाजपला करुन देणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी अशी ठाकरे गटासोबत अशी कोणतीही चर्चा सुरु नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. तर मुंबईच्या महापौरपदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला आहे. (Eknath Shinde-Devendra Fadnavis)
2017 साली नेमकं काय घडलं? (BMC Election 2026)
2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतली होती. अशातच, महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहणार असल्याची चर्चा सुरु आहे. 2017 सारखीच रणनीती आताही असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपने 2017 साली ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होणार नाही, असा निर्णय घेतला होता. पहारेकऱ्याची भूमिकेत भाजप होतं. तसेच भाजपने विरोधी पक्षनेते पद न घेतल्याने, मग काँग्रेसला ते विरोधी पक्ष नेते पद गेले.
मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी 114 नगरसेवकांची गरज- (Mumbai Municipal Corporation Election Result 2026)
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 89 आणि शिंदे सेनेच 29 नगरसेवक निवडून आले होते. तर ठाकरे गटाचे 65 आणि मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी 114 नगरसेवकांची गरज आहे. हा आकडा गाठण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांची मदत घेणे अपरिहार्य आहे. भाजप आपल्याशिवाय मुंबईत महापौर बसवू शकणार नाही, याची जाणीव एकनाथ शिंदे यांना पुरेपूर आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांच्याकडून अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी करण्याचा डाव टाकला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकनाथ शिंदेंची मुंबईत धावाधाव- (Eknath Shinde BMC Election 2026)
नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंची मुंबईत धावाधाव सुरु आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नव निर्वाचित नगरसेवकांचा पालिकेतील 'गट' आज स्थापन केला जाणार आहे. याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया ही आज करून गट नेत्यांची निवड केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. गट नेत्यांच्या यादीत यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले सारख्या तरुण अनुभवी नगरसेवकांच्या नावाची चर्चा सुरु आहे. आज गट स्थापन करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया केल्यास नगरसेवक फुटीबाबत निश्चंत राहता येईल. त्या अनुषंगाने शिवसेनेत हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)
भाजप - 89
शिवसेना ठाकरे गट - 65
शिवसेना - 29
काँग्रेस - 24
मनसे - 6
एमआयएम- 8
एनसीपी - 3
एसपी - 2
एनसीपी शप - 1
————-
एकूण- 227
























