औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध: बाळासाहेब थोरात
औरंगाबादचं नाव बदलून ते संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु असताना आता महाविकास आघाडीतील घटक असलेल्या कॉंग्रेसने याला विरोध केला आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये नाव बदलण्याचा समावेश नसल्याचं कॉंग्रेसनं स्पष्ट केलंय.
मुंबई: औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. आता लवकरच शिवसेनेचं स्वप्न सत्यात येणार असल्याचं दिसत असताना महाआघाडीतील प्रमुख घटक कॉंग्रेसने या नामांतरणाला विरोध केला आहे.
कॉंग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी या नामांतरणाला विरोध करताना म्हटलं की, "संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारनं सामान्य माणसाचं जीवन सुखी कसं होईल हे पाहायचं, हा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या मुख्य हेतू आहे .महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये अशाप्रकारे शहरांचं नाव बदलण्याचं ठरलेलं नाही."
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, "नाव बदलण्याचा हा अजेंडा आम्हाला मान्य नाही .नाव बदलावर काँग्रेसचा विश्वास नाही. शहराच्या नावात बदल करुन काही होत नाही, काही गोष्टींचा इतिहास बदलू शकत नाही. आम्ही विकासाची वाटचाल सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून करत आहोत, हे आमचे सूत्र आहे आणि हे राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांना धरुन आहे. शहराच्या नावात बदल करणे ही गोष्ट आम्हाला मान्यच नाही. या प्रस्तावाला निश्चितच आमचा विरोध राहणार."
शिवसेनेची जुनी मागणी औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्यात यावं यासाठी 19 जून 1995 साली औरंगाबाद महापालिकेनं तसा प्रस्ताव पाठवला होता. राज्यात युतीची सत्ता असताना संभाजीनगर नावाची अधिसूचनाही काढण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करुन आव्हान देण्यात आलं होतं. सरकारला शहराचं नाव बदलण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगत सरकारच्या बाजूनं निर्णय दिला. नंतरच्या काळात राज्यात पुन्हा सत्तेत आलेल्या आघाडी सरकारनं हा नाव बदलण्याचा प्रस्ताव मागे घेतला.
न्यायालयाच्या त्यावेळच्या निर्णयाचा संदर्भ घेऊन औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं असा नवा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात येईल. केंद्राच्या मंजुरीनंतर नव्या नावावर शिक्कामोर्तब होईल. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला एमआयएमचा विरोध आहे.
पहा व्हिडिओ: Balasaheb Thorat | औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध : बाळासाहेब थोरात
संबंधित बातम्या: