एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी? मुख्यमंत्र्यांचा सवाल, तर देवेंद्र फडणवीस म्हणतात..
जिकडे एका मार्गिकेसाठी कारशेड होणार होतं तिथे इतर लाईनसाठीही कारशेड करता येणार आहे. केवळ एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी? : मुख्यमंत्रीभविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला : देवेंद्र फडणवीस
मुंबई : कांजूर कारशेडच्या मुद्द्यावरुन सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी कांजूर कारशेडबाबतच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे. याला ट्विटच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? कारशेडच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "मेट्रोसाठी आपल्याला स्टेंबलिंग लाईनची आपल्याला आवश्यकता आहे. पहिल्या प्रकल्पात स्टेंबलिंग लाईनचा प्रस्ताव नव्हता हे पाहून मला धक्का बसला. आरेमध्ये पर्यावरण वाचवलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्तीही वाढवली. कांजूरमार्गला 40 हेक्टर जागा मिळली होती. कांजूरमार्गची जागा ओसाड आहे. कांजूरमार्गला मेट्रोच्या 3, 4 आणि 6 या मार्गिकेचे कारशेड करता येणार होते. यात एक मोठा फरक आहे. जिकडे एका मार्गिकेसाठी कारशेड होणार होतं तिथे इतर लाईनसाठीही कारशेड करता येणार आहे. केवळ एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी?"
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "आरेमध्ये कारशेड केल्यास त्याचा वापर केवळ पुढच्या पाच वर्षांसाठी होणार होता. पण जर हे कारशेड कांजूरमध्ये केलं तर त्याचा वापर पुढच्या 40 वर्षांसाठी करता येईल. कांजूरमधून आपल्याला थेट अंबरनाथ, बदलापूरपर्यंत मेट्रो नेता येणार आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे."
देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर..
प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? 30 मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय 4 वर्षांचा विलंब वेगळा, कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ 80 टक्के पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाणार, मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
संबंधित बातमी :
केवळ एका लाईनसाठी आरे मध्ये कारशेड का? मुख्यमंत्र्यांचा सवाल
CM Uddhav Thackeray : नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो, पण... - मुख्यमंत्री ठाकरे