कोरोनाच्या संकटानंतर वीकेंड होमची मागणी वाढणार, सुरक्षित घरांसाठीचा पर्याय म्हणून विचार
INMASO या संस्थेने केलेल्या या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कोरोनाचं संकट टळल्यानंतर लोकांचा ओढा वीकेंड होम खरेदीकडे असेल. या निष्कर्षाला पुष्टी देणारी काही निरीक्षणंही या अहवालात नोंदवण्यात आली आहेत. कोरोनाच्या काळात शहरांमध्ये राहणं धोकादायक ठरल्याचं सिद्ध झाल्यानंतर आता वीकेंड होम ही गरज बनेल.

मुंबई : कोरोना काळात ठप्प असलेल्या गृहउद्योग व्यवसायाचं भवितव्य कसं असेल, याबद्दल प्रचंड चिंता व्यक्त होत आहे. असं असताना आता गृहनिर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. कोरोनानंतरच्या जगात वीकेंड होमना प्रचंड मागणी असेल, असा निष्कर्ष INMASO या संस्थेने केलेल्या अभ्यासातून निघाला आहे. कोरोनासारखं संकट पुन्हा आल्यास एक सुरक्षित जागा म्हणून लोक या वीकेंड होमचा विचार करतील, असंही या अहवालात म्हटलं आहे. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे कोरोनानंतर मुंबई महानगर प्रदेशात 1.80 लाख आणि पुणे महानगर प्रदेशात 54 हजार वीकेंड होमची मागणी असेल.
INMASO ही संस्था गेली 15 वर्षं बांधकाम क्षेत्रात सल्लागार म्हणून काम बघत आहे. कोरोनाच्या संकटाची मोठी झळ सध्या बांधकाम उद्योगाला बसली आहे. अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत असून पूर्ण झालेल्या प्रकल्पांना गिऱ्हाईक मिळणे कठीण झाले आहे. मोठ्या शहरांमधून मजुरांचं स्थलांतर झाल्यानेही अनेक प्रकल्प रखडले आहेत. अशा परिस्थितीत बांधकाम व्यावसायिक सरकारकडे मोठ्या आशेने बघत आहेत.
या पार्श्वभूमीवर INMASO या संस्थेने केलेल्या या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कोरोनाचं संकट टळल्यानंतर लोकांचा ओढा वीकेंड होम खरेदीकडे असेल. या निष्कर्षाला पुष्टी देणारी काही निरीक्षणंही या अहवालात नोंदवण्यात आली आहेत. यापूर्वी वीकेंड होम म्हणजे एक महत्त्वाकांक्षा किंवा स्वप्नपूर्ती या दृष्टीने बघितले जात होते. पण कोरोनाच्या काळात शहरांमध्ये राहणं धोकादायक ठरल्याचं सिद्ध झाल्यानंतर आता वीकेंड होम ही गरज बनले, असं मत या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
या अहवालात वीकेंड होमचे भविष्यात असलेले फायदे या मुद्द्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. कोरोना काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दीर्घ काळ वर्क फ्रॉम होमची सुविधा देऊ केली आहे. भविष्यात आणखी कंपन्या हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक लोक शहरात धकाधकीच्या आयुष्यात राहण्यापेक्षा या वीकेंड होमलाच आपलं कायमस्वरूपी घर बनवण्याची शक्यता आहे.
शहराजवळ पण निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं आणि इंटरनेटची चांगली सुविधा असलेलं वीकेंड घर हे आता नेहमीच्या घराला पर्याय बनू शकेल, असं हा अहवाल म्हणतो. त्याशिवाय कोरोनामुळे पर्यटन व्यवसायावर आलेली संक्रांत पाहता पुढल्या काही काळात लोक पर्यटनासाठी बाहेर पडणे अशक्य आहे. अशा वेळी वीकेंड होम हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो, असंही या अहवालात नमूद केलं आहे. तसेच या ग्राहकांकडून प्लॉट विकत घेतले जाण्यापेक्षा अपार्टमेंट किंवा व्हिला घेतल्या जातील, असा निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे.
या अभ्यासानुसार मुंबई-पुण्याजवळ खंडाळा, लोणावळा, इगतपुरी, मुरबाड, अलिबाग, कर्जत, तळेगाव, खोपोली-पाली रोड, वाडा, डहाणू अशा ठिकाणी घरांची मागणी वाढेल. मुंबई महानगर प्रदेशात ही मागणी 1.80 लाखांच्या घरात असेल, तर पुण्यात साधारण 54,000 ग्राहक वीकेंड होममध्ये पैसे गुंतवतील, असा अंदाजही INMASO चे संस्थापक संतोष नाईक यांनी व्यक्त करण्यात आला आहे.
वीकेंड होम खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे वर्गीकरण
वित्त व्यवस्थापन बॅंक लोन घेऊन घर घेणारे- 73 टक्के सेल्फ फंडातून घर घेणारे- 27 टक्के
शिक्षण पदवीधर- 63 टक्के पदवीधर नाही- 12 टक्के प्राथमिक शिक्षण- 4 टक्के पदव्युत्तर आणि व्यावसायिक- 21 टक्के
वीकेंड होम खरेदी करणाऱ्यांचा व्यवसाय पगारदार- 46 टक्के व्यावसायिक- 38 टक्के प्रोफेशनल- 18 टक्के























