एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईतल्या हजारो विहिरी आणि बोअरवेलमधून पाण्याची तस्करी
मुंबई : मुंबईकरांच्या पायाखालची जमीन हादरवणारी एक बातमी समोर येत आहे. मुंबईकरांची तहान मुंबईच्याच जीवावर उठत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ही तहान भागवण्यासाठी टँकर माफिया मुंबईला संकटाच्या गर्तेत घालत आहेत.
रात्रंदिवस धावणाऱ्या मुंबापुरीची पाण्याची तहानही तेवढीच मोठी आहे. मात्र ही तहान भागवण्यासाठी मुंबईलाच तिलांजली देण्याचं काम सुरु आहे. टँकर माफियांकडून सुरु असलेल्या पाण्याच्या अवैध उपश्यामुळे मुंबईतल्या शेकडो इमारतींवर मोठं संकट ओढवू शकतं.
मुंबईला संकटाच्या गर्तेत टाकणाऱ्या टँकर माफियांचा 'एबीपी माझा'च्या इनव्हेस्टिगेशन टीमनं पर्दाफाश केला. मुंबईच्या अंधेरी परिसरातल्या मार्गदर्शन सोसायटीत असलेल्या बोअरवेलमधून दिवसभरात 10 ते 15 टँकर पाणी उपसलं जातं.
त्यासाठी टँकर चालकांकडून सोसायटीला मोठी रक्कम मोजली जाते. टँकर चालकांना अवैध पाण्याची विक्री करणाऱ्या इमारतींची संख्या मोठी आहे. मात्र स्वतःचा खिसा भरण्यासाठी टँकरचालकांनी महापालिकेच्या मैदानांनाही सोडलेलं नाही.
गोरेगावमधल्या नाना-नानी पार्कमधल्या बोअरवेलमधून पाणी उपसताना हा टँकर एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. फक्त पश्चिम उपनगरंच नव्हे, तर जुनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरगाव आणि दादरमध्येही पाण्याच्या अवैध उपसा सुरु आहे. मात्र टँकर चालक असोसिएशनला त्यात काहीच गैर वाटत नाही.
मुंबईत जवळपास 4 हजार खासगी टँकर आहेत. एक टँकरसाठी दिवसभरात 2 लाख लिटर पाण्याचा उपसा होतो. म्हणजे मुंबईच्या गर्भातून दिवसभरात 80 कोटी लिटर पाण्याचा उपसा होता.
पाण्याचा हा अवैध उपसा मुंबईसाठी किती घातक आहे, हे तज्ज्ञांनीच स्पष्ट केलं आहे. मुंबईच्या भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालल्यामुळे जुन्या इमारतींसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेच्या अपुऱ्या पाणी पुरवठा योजनेमुळे टँकर माफियांचं फावतं.
पालिका अधिकाऱ्यांच्या कृपाशिर्वादाशिवाय टँकर माफिया अवैध उपश्याचंही धाडस करणार नाहीत. हा सगळा प्रकार वेळीच थांबवला नाही, तर मुंबईकरांची तहान मुंबईला गिळल्याशिवाय राहणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement