(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत 24 ते 26 मे रोजी थेट येणाऱ्यांसाठी लस मिळणार, लसीकरणासाठी महापालिकेच्या गाईडलाईन्स जारी
मुंबईत 24 ते 26 मे या 3 दिवशी थेट येणाऱ्यांसाठी लस मिळणार आहे. लसीकरणासाठी मुंबई महापालिकेच्या नव्या गाईडलाईन्स जारी.
मुंबई : सोमवार 24 मे ते 26 मे असे सलग 3 दिवस लसीकरणासाठी थेट येण्याची (वॉक इन) मुभा असणार आहे. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईकरांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लसीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
यामध्ये, कोविशिल्ड लसीसाठी
60 वर्ष व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशील्ड लसीच्या पहिल्या मात्रेचे लाभार्थी
60 वर्ष 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी
आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील (फ्रंटलाईन) इतर कर्मचारी यांच्यातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी
45 वर्ष व त्यावरील वयोगटातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी
हे सर्वजण लस घेवू शकतील.
त्यासोबत, कोव्हॅसीन लसीचा विचार करता, सर्व वयोगटातील, दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी येवू शकतील.
(ब) दिनांक 27 मे 2021 ते 29 मे 2021 असे तीन दिवस प्रत्येक केंद्रावर 100% लसीकरण हे कोविन प्रणालीवर नोंदणी केल्यानंतर तसेच लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच (स्लॉट बुकींग) करण्यात येईल.
30 मे रोजी लसीकरण बंद राहणार
आठवड्यातील लसीकरणाच्या सदर नियोजनामध्ये अनपेक्षित कारणांनी काही बदल करावा लागल्यास त्याबाबतची पूर्वसूचना एक दिवस आधी प्रसारमाध्यमं आणि समाज माध्यमं ह्यांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल.
दरम्यान, केंद्र सरकारने अलिकडे केलेल्या सुचनेनुसार, कोविशील्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रांमध्ये पूर्वीच्या 6 ते 8 आठवड्यांऐवजी आता किमान 12 ते 16 आठवड्याचे अंतर असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोविशील्ड लसीच्या पहिल्या मात्रेनंतर 84 दिवसांचे अंतर राखून दुसरी मात्रा दिली जाईल.
ही बाब लक्षात घेता, १ मार्च 2021 पासून कार्यान्वित झालेल्या लसीकरण टप्प्यातील 60 वर्ष व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी तसेच आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांनी 1 मार्च 2021 रोजी कोविशील्ड लसीची पहिली मात्रा घेतली असल्यास, त्यांना 24 मे 2021 अथवा 84 दिवसांनंतर दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.