मुंबईत इमारतीच्या 23व्या मजल्यावर तरूणाचा जीवघेणा स्टंट; पोलिसांकडून शोध सुरु
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ मुंबईतील असून या व्हिडीओमध्ये एक तरूण जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. एका उंच इमारतीच्या 23व्या मजल्यावर खिडकी बाहेर जीवघेणा स्टंट करत असून व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरु केला आहे.
मुंबई : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. त्याचा हा स्टंट पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओमध्ये हा तरूण एका उंच इमारतीच्या 23व्या मजल्यावर खिडकी बाहेर जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. हा स्टंट करताना या तरूणाने कोणतीही सुरक्षेविषयक काळजी घेतलेली नाही. व्हायरल होणारा हा व्हिडीओ मुंबईतील असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ याप्रकणी तपास करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई पोलिसांनी तपास सुरु करताच हा व्हिडीओ कांदिवलीतील एका तरूणाने शूट केल्याचं निष्पन्न झालं आहे. कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली. कांदिवलीचे पोलीस निरिक्षक रवी अडाने यांनी सांगितले की, हा व्हिडीओ कांदिवली पश्चिम भागात असणाऱ्या भारत बिल्डिंगमधील 23व्या मजल्यावर शूट करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणीपोल चौकशी केल्यानंतर ज्या मजल्यावरील घरात हा व्हिडीओ शूट केला जात होता. त्यासंदर्भात माहिती मिळाली आहे.
पाहा व्हिडीओ : कांदिवलीत 23 व्या मजल्याच्या कठड्यावरुन तरुणाचा धक्कादायक स्टंट
पोलिसांचं म्हणणं आहे की, स्टंट करणारा तरूण फरार झाला आहे. चौकशीमध्ये तरूणाचं नाव आणि त्याची ओळखही पटली आहे. एक तरूण स्टंट करत होता आणि त्याच्यासोबत असेलेल 2 तरूण त्याचा स्टंट कॅमेऱ्यात शूट करत होते. पोलीस सध्या या तिघांचाही शोध घेत आहेत.
सोशल मीडियावर तत्काळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी सेल्फी किंवा व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात दरवर्षी कोट्यवधी लोक मृत्यूमुखी पडतात. तसेत इंटरनेटवर अनेक सोशल मीडिया चॅलेंजेसही व्हायरल होत असतात. ज्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.