Coronavaccine : लसीच्या तुटवड्यामुळे कल्याण डोंबिवलीमधील लसीकरण उद्यापासून ठप्प होणार
कल्याण डोंबिवलीत दररोज हजारांहून अधिक कोवीड रुग्ण सापडत आहेत. सर्व कोवीड रुग्णालये फुल, बेड नाही, आयसीयू नाही व्हेंटिलेटर नाही की ऑक्सिजनही नाही.
कल्याण- डोंबिवली : कल्याण डोंबिवलीकरांमागचे लसींचं दृष्टचक्र काही केल्या संपायचे नाव घेत नाहीये. एकीकडे दररोज कोवीड रुग्ण आणि कोवीडमुळे मृत्यूमध्ये होणारी वाढ ही संख्या चिंतेमध्ये अधिक भर टाकत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीकडे असणारा कोवीड लसींचा साठा संपल्याने उद्यापासून कोवीड लसीकरण पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे.
कल्याण डोंबिवलीत दररोज हजारांहून अधिक कोवीड रुग्ण सापडत आहेत. सर्व कोवीड रुग्णालये फुल, बेड नाही, आयसीयू नाही व्हेंटिलेटर नाही की ऑक्सिजनही नाही. अशा भयानक परिस्थितीत कोवीडची लस हाच काय तो आशेचा किरण. मात्र दुर्दैव...हा आशेचा किरणही सध्या अंधारातच चाचपडत असल्याचे दिसत आहे. कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या सुमारे 13 लाखांचा घरात, कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून कोवीड लसींची केली जाणारी मागणीही लाखांच्या घरात आहे. पण केडीएमसीच्या पदरात पडतात किती तर अवघ्या काही हजार लसी मिळत आहे. कल्याण डोंबिवलीत एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असताना त्यांच्या तुलनेत कोवीड लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र सध्यातरी ते होताना दिसत नाही.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत महापालिकेच्या 17 आणि 13 खासगी अशा 30 सेंटरमधून दिवसाला सुमारे 4500 जणांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. जानेवारीपासून आतापर्यंत 1 लाख 29 हजार 353 नागरिकांचेच लसीकरण करण्यात आले. गेल्या आठवड्यापासून लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याने काही खासगी सेंटरमध्ये फक्त दुसरा डोस दिला जात होता. तर पालिकेच्या 13 सेंटरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू होते. मात्र आज पालिकेकडे अवघा 3 हजार लसीचा साठा उपलब्ध होता. सकाळपासून केलेल्या लसीकरणानंतर हा साठा संपल्यामुळे आता उद्याचे काय ? असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. लस मिळाली नाही तर नाईलाजाने उद्या लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. आज 67 हजार 468 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 54 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.15 टक्के झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :