(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाची सुमोटो याचिका; केंद्र सरकारला राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे निर्देश
ऑक्सिजन पुरवठा, आवश्यक औषधे आणि लसीकरणाची पद्धत यावर एक राष्ट्रीय धोरण तयार करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक सुमोटो याचिका दाखल करुन केंद्र सरकारला एक नोटीस जारी केली आहे. या याचिकेत देशातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा, औषधे आणि उपलब्ध बेड्स आणि लसीकरणाची पद्धत यावर एक राष्ट्रीय धोरण तयार करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुरुवारी सांगितलं की, देशात वेगवेगळ्या सहा उच्च न्यायालयात कोरोना संबंधी याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात संदिग्धता निर्माण होऊ शकते. ही गोष्ट लक्षात घेता या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचे निर्देश या खंडपीठाने दिले आहेत. या खंडपीठात न्यायमूर्ती नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती रविंद्र भट या इतर दोघांचा समावेश आहे.
SC takes suo motu cognisance on prevailing COVID-19 situation in India, issues notice to Centre
— Press Trust of India (@PTI_News) April 22, 2021
सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतलेल्या या कोरोना व्यवस्थापनेसंबंधित सुमोटो याचिकेसाठी अॅमिकस क्युरी म्हणून जेष्ठ वकील हरिश साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक भागात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनच नाही. तसेच रुग्णांना बेड मिळणे अवघड होत आहे. तीच स्थिती रेमडेसिवीर इन्जेक्शनच्या बाबतीत आहे. त्यामुळे देशातील आगोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोना रुग्ण ज्या प्रमाणात वाढत आहेत त्या प्रमाणात त्यांना लसींचा पुरवठा होत नाही. तसेच इतरही सुविधा मिळत नाहीत. याचा परिणाम देशातील कोरोना विरोधातल्या लढ्यावर होत आहे. त्यामुळेच आता सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून पुढाकार घेतला असून सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. आता केंद्र सरकारने यावर एक राष्ट्रीय धोरण तयार करावं असाही निर्देश दिला आहे.
भारतात झपाट्यानं वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. भारतातील वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं जगभरातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जगभरात पहिल्यांदाच एका दिवसात सव्वा तीन लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 314,835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2104 रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान, 178,841 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, यापूर्वी अमेरिकेत 8 जानेवारी रोजी एका दिवसांत सर्वाधिक तीन लाख सात हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Privacy Policy Case : प्रायव्हसी पॉलिसी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने Facebook आणि WhatsApp ची याचिका फेटाळली
- कोरोना लस ठरतेय प्रभावी! लसीकरण झालेल्या 0.04 टक्के जणांना कोरोनाची बाधा, केंद्राचा अहवाल
- India Corona Cases Update : देशात कोरोना रुग्ण संख्येचा नवा उच्चांक, 24 तासांत पहिल्यांदाच सव्वा तीन लाख रुग्णांची नोंद