अँटिलिया आणि मनसूख हिरेन प्रकरणात सचिन वाझेने वसुली केलेल्या पैशांचा वापर: NIA
अँटिलिया तसेच आणि मनसूख हिरेन प्रकरणाला अंतिम स्वरुप देण्यासाठी बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेने (Sachin Waze) वसुल केलेल्या पैशांचा वापर करण्यात आल्याचं एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये नोंद केली आहे
मुंबई : देशभर गाजत असलेल्या अँटिलिया तसेच आणि मनसूख हिरेन प्रकरणाला अंतिम स्वरुप देण्यासाठी बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेने वसुल केलेल्या पैशांचा वापर करण्यात आल्याचं एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये नोंद केली आहे. या प्रकरणी एनआयएने बोरिवलीतील एका व्यावसायिकाची साक्षही नोंदवली आहे.
सचिन वाझेकडून वसुली कशा प्रकारे केली जायची याची नोंद एनआयएने बोरिवलीतील एका हॉटेल व्यावसायिकाच्या साक्षीवरुन केली आहे. या व्यावसायिकाने सांगितलं की, 14 आणि 15 डिसेंबरला त्याला एका दुसऱ्या हॉटेल व्यावसायिकाचा फोन आला आणि पोलीस आयुक्तालयात बोलावल्याचा निरोप देण्यात आला. पोलीस आयुक्तालयात आधीपासूनच अनेक हॉटेल व्यावसायिक हजर होते. त्यावेळी हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि बार यांच्या कलेक्शनवर चर्चा करण्यात आल्याचंही त्या व्यावसायिकाने सांगितलं आहे.
पाच कोटींचा हप्ता
आपल्या केबिनमध्ये सचिन वाझे यांनी क्राईम ब्रँचचे सोशल सर्व्हिस ब्रँचच्या एसीपी संजय पाटील यांना बोलवलं आणि झोन 1 ते झोन 12 मधल्या हॉटेल व्यावसायिकांकडून महिना पाच कोटी रुपये वसुली करण्याचा प्रस्ताव ठेवला. जे लोक हप्ता देतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करायची नाही असंही यावेळी ठरवण्यात आलं.
कोरोनामुळे आधीच नुकसान झालेल्या व्यावसायिकांनी हप्ते देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर सचिन वाझेने त्यांच्यासमोर एक नवीन फॉर्म्युला ठेवला. लहान हॉटेल व्यावसायिकांकडून एक लाख, मध्यम व्यावसायिकांकडून दोन लाख तर चांगली कमाई करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांकडून तीन लाख वसुलीचे आदेश दिले. या वसुलीची जबाबदारी काही हॉटेल व्यावसायिकांवर टाकण्यात आली होती.
ठरल्याप्रमाणे आपण 28 लाखांचा पहिला हप्ता हा 18-19 डिसेंबरला दिला आणि त्यानंतर 23 डिसेंबरला 13 लाख रुपये दिले. आणखी एका व्यापाऱ्याने 10-12 जानेवारीला वाझेकडे 80 ते 86 लाख रुपये दिले. त्यानंतर 17-18 जानेवारीला 40 लाख रुपये दिले असं या व्यापाऱ्याने एनआयएला सांगितलं आहे.
त्यानंतर सचिन वाझेला या व्यापाऱ्याने फेब्रुवारी महिन्यात 12 तारखेला 89 लाख रुपये, 17 तारखेला 40 लाख रुपये देण्यात आल्याचंही नोंद करण्यात आली आहे. मनसूख हिरेनला अनेकदा सचिन वाझेने त्याच्या केबिनमध्ये बोलावल्याचंही या व्यापाऱ्याने आपल्या साक्षीत सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :