मराठा आरक्षण सुनावणीदरम्यान हायकोर्टात नाट्यमय घडामोडी
मराठा आरक्षणावरील सर्व याचिकांची सुनावणी न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे वर्ग करण्यास अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे.
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सुरु असलेल्या सुनावणीत शुक्रवारी हायकोर्टात काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. मराठा आरक्षणावरील सर्व याचिकांची सुनावणी न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे वर्ग करण्यास अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. राज्य सरकारनं यासंदर्भात उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागण्यासाठी न्यायमूर्ती रणजित मोरेंपुढे विनंती अर्ज सादर केला.
त्याचदरम्यान अॅड. सदावर्ते यांनी आपली अडचण कोर्टापुढे मांडली. मात्र या दोन्ही संदर्भात सोमवारी सुनावणी ठेवली आहे. कारण ऑगस्ट 2018 मधील एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान काही आक्षेपांमुळे न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी अॅड. जयश्री पाटील आणि अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर सुनावीस नकार दिलाय. त्यामुळे पुन्हा आम्हाला कसं ऐकणार? असा सवाल सदावर्तेंनी उपस्थित केला.
आपली ही व्यथा सदावर्तेंनी तात्काळ मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्यापुढे मांडली. मात्र यावर तूर्तास कोणतेही निर्देश न देता मुख्य न्यायमूर्तींनी सर्वांना सोमवारपर्यंत वाट पाहण्याचे निर्देश दिलेत. तसेच आपापसांत समजुतीनं यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिलेत.
यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आपली हरकत नाही, मात्र उद्या उगाच आणखीन कुणी आक्षेप घेऊ नये. असे सुतोवाच एबीपी माझाशी बोलताना दिले.